वाशिम : ग्राहक हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेच्या सर्व अशासकीय व शासकीय सदस्यांनी प्रत्येक ग्राहकाच्या हक्काचे संरक्षण करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यलयात ७ सप्टेंबरला आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संदीपान सानप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. खांडेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी प्रमोदचंद्र गंडागुळे, गजानन साळी, सुधीर घोडचर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, ग्राहक हक्क संरक्षणासाठी प्रयत्न करणारे अशासकीय सदस्य व सर्व शासकीय सदस्य यांच्या समन्वयातून ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेचा उद्देश लक्षात घेऊन तो सफल करण्यासाठी प्रत्येक सदस्याने आपले योगदान द्यावे व ग्राहकांचे प्रश्न या परिषदेसमोर मांडावेत.या सभेमध्ये कारंजा शहरातील नागरिकांना आलेले अवास्तव वीज बिल, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत घेण्यात येणारे लनिर्ंग लायसन्स कॅम्प, वजन मापन विभागाशी संबंधित तक्रारी, वाशिम शहर व जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था व त्याचा नागरिकांना होणारा त्रास याविषयी चर्चा झाली. यावेळी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सानप यांनी सभेचे प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची रचना, उद्देश व कर्तव्य याविषयी माहिती दिली.
ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास प्राधान्य द्या
By admin | Updated: September 9, 2015 01:49 IST