मंगरुळपीर: वॉटर कप स्पर्धेंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी झटणाऱ्या ग्रामस्थांना हातभार लागावा, त्यांचा उत्साह वाढावा म्हणून मंगरुळपीरचे पोलीस प्रशासनही सरसावले आहे. मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी आणि ठाणेदारांसह ३५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील आदर्श ग्राम सायखेडा येथे १ मे रोजी दुपारी ४.३० वाजतापासून श्रमदान केले. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांचा उत्साह कमालीचा वाढून त्यांना श्रमदानासाठी बळ आल्याचे दिसले. वॉटर कप स्पर्धेंतर्गत मंगरुळपीर तालुक्यात सहभागी गावांत श्रमदानाची जणू लाटच उसळली आहे. गावातून पाणीटंचाई कायम हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थ झपाटले आहेत. विविध गावांत सकाळी, सायंकाळी प्रत्येकी चार तास संपूर्ण गाव श्रमदान करीत आहेत. या ग्रामस्थांचा उत्साह वाढावा म्हणून पाणी फाऊंडेशनने नागरी भागातील जनतेला हाक दिली आणि यासाठी जलमित्र नोंदणी मोहिम राबवून १ मे रोजी महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन केले. या मोहिमेला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी गावागावात श्रमदान केले. तालुक्यातील सायखेडा येथेही श्रमदानाची ही लाट पाहायला मिळाली. विशेष म्हणजे जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाºया पोलीस प्रशासनानेही यात सहभाग घेत श्रमदना करून ग्रामस्थांचा उत्साह वाढविला. जवळपास दोन तास पोलिसांनी येथे श्रमदान केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव म्हणाले की. सायखेडा गाव दुष्काळमुक्त व्हावे यासाठी ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहेत. त्यांनी श्रमदानातूनच विविध प्रकारच्या बांधबदिस्तीसह पाणलोट उपचाराची कामे केली आहेत. यामुळे भावी काळात हे गाव पाणीदार होईल, यात तिळमात्र शंका उरली नाही. या ग्रामस्थांचा उत्साह वाढावा आणि त्यांना थोडा हातभारही लागावा, या उद्देशाने पोलीस प्रशासनाने येथे महाश्रमदानात सहभाग घेतला. ठाणेदार रमेश जायभाये म्हणाले की, पोलीस प्रशासन जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडतेच; परंतु जनतेच्या भल्यासाठी गरज पडल्यास इतरही कामे करण्यास पोलीस तत्पर असतात. सायखेडा येथे श्रमदान करून आम्ही त्याची प्रचिती दिली. दरम्यान, गावकºयांनी रचनात्मकपध्दतीने केलेले दगडीबांध, कटुरबांध, शेततळे आदि कामांची पाहणी पोलिसांनी करुन त्यांचे कौतूक केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कांबळे, खांदवे, सरपंच विद्या गहुले, देवमन गहुले, उपसरपंच मनिष गहुले, युवराज गहुले, डिंगाबर काळे, गजानन गहुले, कृषी सहाय्यक वासुदेव चव्हाण, वॉटर हिरो नारायण अव्हाळे, दूर्गा मोरे, डिंपल भगत, विजय पारवे आदिंनीही श्रमदान केले. यादरम्यान कार्यक्रमाचे संचालन नारायण अव्हाळे यांनी केले, तर आभार मंगेश गहुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसर्व वाटर हिरोज गावकºयांनी पुढाकार घेतला होता.
मंगरुळपीर तालुक्यात पोलीसही सरसावले जलसंधारणाच्या कामासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 13:36 IST
मंगरुळपीर: वॉटर कप स्पर्धेंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी झटणाऱ्या ग्रामस्थांना हातभार लागावा, त्यांचा उत्साह वाढावा म्हणून मंगरुळपीरचे पोलीस प्रशासनही सरसावले आहे.
मंगरुळपीर तालुक्यात पोलीसही सरसावले जलसंधारणाच्या कामासाठी
ठळक मुद्देजलमित्र नोंदणी मोहिम राबवून १ मे रोजी महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन केले.ग्रामस्थांचा उत्साह वाढावा आणि त्यांना थोडा हातभारही लागावा, या उद्देशाने पोलीस प्रशासनाने येथे महाश्रमदानात सहभाग घेतला. रचनात्मकपध्दतीने केलेले दगडीबांध, कटुरबांध, शेततळे आदि कामांची पाहणी पोलिसांनी करुन त्यांचे कौतूक केले.