वाशिम : येथील विठ्ठल दालमिल मध्ये ९ नोव्हेंबर रोजी डाळ बनविणारी चाडी कोसळल्यामुळे हरभर्याच्या ढिगाखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दालमिलचे मालक प्रवीण बाहेती यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. याप्रकरणी न्यायालयाने आज १४ नाव्हेंबर रोजी बाहेती यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. हिंगोली मार्गावरील बाहेती यांच्या विठ्ठल दालमिलमध्ये ९ नोव्हेंबर रोजी हरभर्याची डाळ बनविण्याचे काम सुरू असताना डाळ बनविण्याच्या चाडीमध्ये हरभरा टाकणार्या मजुरांच्या अंगावर अचानक तीनशे ते चारशे क्विंटल हरभरा असलेली चाडी कोसळली. यामध्ये तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जमादार संजय आमटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वाशिम पोलिसांनी दालमिलचे मालक प्रवीण जमनलाल बाहेती यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३0४, ३२३, ३३६ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. १0 नोव्हेंबर रोजी बाहेती यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. १४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी पुन्हा वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी बाहेती यांना हजर केले. न्यायालयाने बाहेती यांना १४ दिवसांसाठी वाशिम येथील जिल्हा कारागृहात रवाना केले.
विठ्ठल दालमिलच्या मालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By admin | Updated: November 15, 2014 01:06 IST