लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या १६६७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्यापही या कामाचे मानधन मिळू शकले नाही. जिल्हा निवडणूक विभागाने ठरलेल्या प्रमाणानुसार निधी देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असताना आवश्यक निधीपैकी निम्म्याहून अधिक निधी अद्यापही प्रशासनास प्राप्त झाला नाही.
वाशिम जिल्ह्यात १ एप्रिल ते ३० डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपलेल्या १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. या प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली; परंतु त्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५२ ग्रामपंचायतींसाठीच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी १६६७ अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनासह साहित्य आणि इतर प्रक्रियेसाठी शासनाकडून प्रती ग्रामपंचायत ४९ हजार रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. तशी मागणीही जिल्हा निवडणूक विभागाने केली; परंतु सद्य:स्थितीत त्यापैकी प्रती ग्रामपंचायत २३ हजार रुपये प्रमाणेच निधी प्रशासनास प्राप्त झाला असून, अद्यापही प्रती ग्रामपंचायत २६ हजार रुपये प्रमाणे ३९ लाख ५२ हजार रुपयांचा निधी अप्राप्त आहे. त्यामुळे निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानधनही रखडले आहे.
--------------
२०१७चे मानधनही प्रलंबितच
जिल्ह्यात यापूर्वी २०१७ मध्येही मुदत संपलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेसाठीही अधिकारी, कर्मचारी मिळून १८०० पेक्षा अधिक लोकांची नियुक्ती करण्यात आली. आता या निवडणूक प्रक्रियेस तीन वर्षांचा कालावधी उलटला असला तरी, या निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी जवळपास निम्म्या लोकांचे मानधन अद्यापही मिळाले नाही, तर मानधन मिळालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली होती.
-------------------
जेमतेम हजार रुपये मानधन
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक विभागामार्फत अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पार पाडली जाते. यात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाकडून रितसर प्रशिक्षण दिले जाते. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळ द्यावा लागतो. शिवाय निवडणूक प्रक्रियेत मतदान प्रक्रियेच्या पूर्वसंध्येलाच मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन ताब्यात घेऊन हजर राहावे लागते. या सर्व प्रक्रियेसाठी प्रशिक्षणासह अधिकारी, कर्मचाऱ्यांना जेमतेम हजार रुपये मानधन मिळते, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे.
----------------------
कोट: जिल्ह्यात १५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेसाठी अधिकारी, कर्मचारी मिळून १६६७ लोकांची नियुक्ती करण्यात आली होती. या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि इतर कामकाजाच्या मानधनासह निवडणूक प्रक्रियेसाठी प्रती ग्रामपंचायत शासनाकडून ४९ रुपये निधी दिला जातो. या संदर्भात प्रस्तावही पाठविला आहे. प्रत्यक्षात प्रती ग्रामपंचायत २३ हजार रुपये प्रमाणे निधी प्राप्त झाला असून, तो निधी तहसीलस्तरावर पाठविण्यात आला आहे. यातूनच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानधन अदा केले जाणार आहे. उर्वरित निधी मिळताच तो तहसीलस्तरावर वर्ग करून मानधन अदा करण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करू.
-सुनील विंचनकर,
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, वाशिम