लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. दरम्यान, शुक्रवारी नव्याने केवळ ८६ रुग्ण आढळले; तर दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर घेण्यात आली. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात आज केवळ एक रुग्ण आढळला, अशी माहिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली.कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्याकरिता जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून जिल्हाभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची अपेक्षित फलश्रुती आता दिसायला लागली असून, २८ मे नंतर सातत्याने केवळ दोनअंकी रुग्णसंख्या असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर ठेवाव्या लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही तुलनेने कमी झाले आहे. हे चित्र असेच कायम राहिल्यास लवकरच जिल्हा पूर्णत: कोरोनामुक्त होईल, असा आशावाद सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.दरम्यान, शुक्रवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहर व तालुक्यात २५, मालेगाव तालुक्यात ४, रिसोड तालुक्यात ७, मंगरूळपीर तालुक्यात २४, कारंजा तालुक्यात २१; तर मानोरा तालुक्यातील रामतिर्थ येथे केवळ एक रुग्ण आढळल्याची नोंद घेण्यात आली. जिल्ह्याबाहेरील चारजणांचा बाधितांमध्ये समावेश आहे.
वाशिम : नव्या रुग्णांचा आकडा शंभराच्या खाली, आणखी दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 11:47 IST