शिखरचंद बागरेचा / वाशिम
संपूर्ण जगामध्ये अखंड लोकशाही परंपरा जोपासणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. सर्वसाधारण नागरिकांचा देश असलेल्या भारतीय शासन प्रणालीत मतदानाची टक्केवारी पाहीजे तशी फारशी चांगली नाही. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी मतदारांच्या मतपरिवर्तनाची गरज आहे. असा सुर लोकमत परिचर्चेत मान्यवरांनी व्यक्त केला. स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने रविवार १२ ऑक्टोबर रोजी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठीचे उपाय व प्रयत्न या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. सदर परिचर्चेत शहरातील मानसिक रोग तज्ज्ञ डॉ.नरेश इंगळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल कावरखे, प्रा.अनिल काळे, निसर्ग मित्र युवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी वाटाणे व स्वानंद शेवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय शासन प्रणालीचा कारभार लोकशाहीच्या मजबुत खांबावर चालत असून लोकांच्या विकासासाठी लोकांनी लोकशाही पद्धतीने निवडलेले शासन म्हणजेच लोकशाही राजवट होय. कृषि प्रधान असलेल्या भारत देशात लोकशाही पद्धतीने शंभर टक्के मतदान झाल्याचा अद्यापपर्यंत तसा पुरावा नाही. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी काय उपाय योजना करता येतील अथवा त्यासाठी कोणते प्रयत्न करायचे याबाबत सदर परिचर्चेत मान्यवरांनी उहापोह केला.