वाशिम : ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखडे यांच्या समर्थनार्थ वरूड तोफा (ता.रिसोड) येथील नातेवाईक सरसावले असून, ६ नोव्हेंबर रोजी वाशिम शहरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरूद्ध अनु. जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.सुपरस्टार शाहरूख खान यांच्या मुलावर कारवाई केल्यानंतर समीर वानखडे प्रकाशझोतात आले असून, गेल्या महिनाभरापासून मंत्री नवाब मलिक हे वानखडे यांच्या विरोधात बोलत आहेत. या पार्श्वभूमीवर समीर वानखडे यांचे मूळ गाव असलेल्या वरूड तोफा (ता.रिसोड) येथील नातेवाईक व नागरीक आक्रमक झाले असून, शनिवारी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा काढण्यात आला. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाला सुरूवात झाली. शहर पोलीस स्टेशन येथे मोर्चा धडकताच विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदारांना देण्यात आले. नवाब मलिक यांनी समीर वानखडे यांच्या विरोधात बोलणे बंद केले नाही तर महाराष्ट्रभरात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे नातेवाईक रोहित वानखडे यांनी सांगितले. गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदनराज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी समीर वानखडे यांच्या नातेवाईकांनी यावेळी केली. गुन्हे दाखल करावे, अशा मागणीचे निवेदन वाशिम शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले. वरीष्ठ स्तरावर निवेदन पाठविणार असल्याचे पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितले.
समीर वानखडेंच्या समर्थनार्थ वाशिमात मोर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 17:48 IST