शिरपूर जैन: मालेगाव तालुक्यातील बहुप्रतिक्षीत मिर्झापूर प्रकल्पाचे काम मागील सहा वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी आमदार अमित झनक यांच्याकडे प्रकल्पाच्या कामाची दखल घेण्याची मागणी केली. त्यानुसार आमदार अमित झनक यांनी ३० एप्रिल रोजी शेतकऱ्यांसह मिर्झापूर प्रकल्पाची पाहणी केली. सदर प्रकल्पाचे काम त्वरीत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. जवळपास ११ वर्षांपूर्वी मंजूर असलेल्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर पासून २ किमी अंतरावर मिर्झापूर लघू प्रकल्पाचे काम २००९-१० मध्ये सुरु करण्यात आले. हे काम विविध कारणाने वेळोवेळी रखडल्याने अद्यापही पुर्ण होउ शकले नाही. त्यातच पांगरखेडा ते चांडसला जोडणारा रस्त्यावरील जुना पूल बुडीत क्षेत्रात गेला. त्यामुळे तेथे नविन मोठा पुल निर्माण करणे गरजेचे होते. नविन पुलाचे काम जानेवारी मध्ये सुरू करण्यात आले. काम संथगतीने होत असल्याने यावर्षीही काम पूर्ण होण्याबाबत शंका निर्माण झाली होती परिणामी ६१० हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहण्याची भिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले हे काम लवकरच व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांना वेळोवेळी निवेदनही दिले; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शेवटी शेतकऱ्यांना आमदार अमित झनक यांना प्रकल्पाचा कामात लक्ष देण्याची विनंती केली. त्यानुसार ३० एप्रिल रोजी आमदार झनक यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेवून मिर्झापूर प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.
प्रकल्पाच्या रखडलेल्या कामाची आमदाराकडून दखल
By admin | Updated: May 1, 2017 19:46 IST