कोरोनामुळे अनेक कारणांनी ताणतणाव, कलह वाढले आहेत. रोजगार गेल्याने कौटुंबिक कलह तर काही ठिकाणी नोकरी असुरक्षित असल्याची भावनाही ताणतणावास कारणीभूत ठरते. इतरही काही कारणांनी आलेले नैराश्य, नकारात्मक भावना आणि त्यासोबतच अव्यक्त होण्याचे प्रकार वाढत आहेत. परिणामी, घराघरात संवाद अत्यल्प होत असून, अनेक जण मानसिक तणावाखाली वावरत असल्याचे समोर येत आहे. कामाचा ताण, घराचे हप्ते, हाती पैसे नसणे यामुळे कुटुंबाचे कसे होणार, जबाबदाऱ्या कशा पूर्ण होणार, याचा मनावर ताण असतो. योग्य वेळी योग्य व्यक्तीकडे याबाबत व्यक्त न झाल्यास समस्या वाढतात. या समस्या टाळण्यासाठी व्यक्त व्हा, मोकळे व्हा, बोलते व्हा, जवळच्या व्यक्तीसोबत संवाद वाढवा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.
०००००
मन हलके करणे हाच उपाय
नकारात्मक काढून टाकण्यासाठी स्वत:वर आत्मविश्वास ठेवणे.
नियमित व्यायाम, योग व प्राणायाम करणे.
रागावर नियंत्रण मिळविणे, रागाला शांत ठेवणे.
जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त होणे.
बोलून मन हलके करणे.
सकारात्मक विचार करणे.
संयमी, सहनशीलता वाढीस लावणे.
सकस आहार घेणे.
पुरेशी झोप घेणे.
चिडचिड न करणे.
...................
कोरोनाकाळात कुठेतरी संवादाची दरी वाढत असल्याचे दिसून येते. रोजगार, नोकरी हिरावल्यामुळे नैराश्य येते. मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी संवाद वाढविणे आवश्यक आहे. कोणताही ताण मनावर न घेता व्यक्त व्हायला शिकणे गरजेचे आहे.
- डॉ.नरेश इंगळे, मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम.
................
मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी सदैव चिंतामुक्त राहणे आवश्यक आहे. एखाद्या विषयाचा ताण असेल, तर त्याबाबत जवळच्या व्यक्तीला, कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला पाहिजे. संवादातून मार्ग निघतो.
- डॉ.मंगेश राठोड, मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम.