वाशिम - मार्च एन्डिंगपूर्वी आर्थिक वर्षातील कार्यालयीन सोपस्कार पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय-निमशासकीय कार्यालये चवथा शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.शासकीय-निमशासकीय कामकाजाचे आर्थिक वर्षे म्हणून १ एप्रिल ते ३१ मार्च अशी गणना केली जाते. एका आर्थिक वर्षातील शासकीय-निमशासकीय व्यवहार व कामकाज ३१ मार्चपूर्वी पूर्ण करणे, शासनाचा निधी खर्च करणे, आवश्यक त्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेणे, देयके काढण्यासाठी अपूर्ण कामे पूर्ण करणे बंधनकारक आहे. ३१ मार्चपूर्वी निधी खर्च झाला नाही तर अखर्चित निधी म्हणून शासनदरबारी जमा केला जातो. निधी अखर्चित राहू नये तसेच ३१ मार्चपूर्वी सर्व आर्थिक कामकाज पूर्णत्वाकडे नेण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषी विभाग, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बँकादेखील सुट्टीच्या दिवशी सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. २६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयातील लेखा विभाग, पंचायत समितीचा लेखा विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय सुरू असल्याचे दिसून आले.
‘मार्च एन्डिंग’मुळे सुट्टीच्या दिवशीही अधिकारी-कर्मचारी ‘कर्तव्या’वर!
By admin | Updated: March 26, 2017 16:56 IST