लोहगांव (कारंजा, जि. वाशिम) : कारंजा तालुक्यातील लोहगांव येथील पाणी पुरवठा योजना गत आठ दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. लोहगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने उकर्डा शिवारातील विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. यासाठी विहिरीवर बसविण्यात आलेला पंप नादुरुस्त झाल्यामुळे येथील पाणी पुरवठा बंद झाला. गावातील पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर ग्रामपंचायतकडे पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. महिला आणि बालकांना शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणावे लागते किंवा गावातील खासगी बोरवरून पाणी भरून दिवस काढावे लागत आहेत. विहीरीला भरपूर पाणी असतानाही तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा बंद झाल्याने लोहगाव येथे भर हिवाळय़ात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अशाचप्रकारे बंद होत असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर ग्रामस्थांना त्रास होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे. तथापि, गावांतील अनेकांकडे पाणीकर थकित असून, ग्रापंला फारसे उत्पन्न मिळत नसल्याने पर्यायी व्यवस्था करणे कठीण असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
लोहगाव पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद
By admin | Updated: January 6, 2015 00:36 IST