शारीरिक, मानसिक, लैंगिक, कौटुंबिक छळ, अॅसिडहल्ला किंवा सायबर क्राइममधील पीडिता यासह कोणत्याही अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. मात्र अत्याचाराचा सामना करावा लागल्यानंतर अशा व्यक्तींकडे जाऊन कोणत्याही प्रकारची मदत घेण्याची मानसिकता संबंधित महिलांची नसते. अशा महिलांना ‘सखी वन स्टॉप सेंटर’मध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. या माध्यमातून वर्षभरात ४९ महिलांचा संसार सुरळीत झाला आहे.
....................................
सर्वाधिक तक्रारी हिंसाचाराच्या
सखी वन स्टॉप सेंटरकडे प्राप्त होणाऱ्या एकूण तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत. यासह पतीच्या मृत्यूनंतर निराधार होणाऱ्या महिलांकडूनही तक्रारी केल्या जातात.
सखी वन स्टॉप सेंटर २४ तास सुरू राहत असून रात्रीच्या सुमारास तक्रार घेऊन येणाऱ्या महिलेलाही या माध्यमातून मानसिक आधार देण्याचे काम केले जात आहे.
अत्याचारग्रस्त महिलांना पोलीस, वकील, समुपदेशकांची नितांत गरज असते. अशावेळी या स्वरूपातील सर्व सुविधा पुरविण्याचे काम सखी वन स्टॉप सेंटरकडून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
........................
तक्रारी
वाशिम - १७
रिसोड - ५
मालेगाव - ४
मंगरूळपीर - ८
कारंजा - १०
मानोरा - ५
...........................
सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध
वाशिम येथे सखी वन स्टॉप सेंटरला स्वतंत्र इमारत अद्याप मिळालेली नाही. असे असले तरी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी पुढाकार घेऊन तथा जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आदींकडे वेळोवेळी पाठपुरावा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
अत्याचारग्रस्त, पीडित महिलांची समस्या जाणून घेत त्यांचे मानसिक समुपदेशन केंद्राकडून केले जाते. गरज पडल्यास किमान पाच दिवसांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधाही या केंद्रामध्ये उपलब्ध करून दिली जाते.
एखादी पीडित महिला पाच दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी वास्तव्य करणार असेल तर ‘शासकीय वात्सल्य’ या महिलांच्या वसतिगृहामध्ये तिची रवानगी केली जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली.