मलकापूर (जि. बुलडाणा) : भंडारा जिल्ह्यातील साकोली वनक्षेत्रातील जांभळी (खांबा) येथे धुमाकुळ घालून व एका वृध्देचा बळी घेणार्या नरभक्षक बिबट्याला बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेत असताना ह्यत्यालाह्ण आरामासाठी ७ एप्रिल रोजी मलकापूर येथील विश्रामगृहावर बंदोबस्तात ठेवण्यात आले होते. या नरभक्षी वाघाला पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली. जांभळी (खांबा) येथे धुमाकूळ घालून एका बिबट्याने वृध्देचा बळी घेतला होता. त्यामुळे या नरभक्षक बिबट्याला वनविभागाच्या कर्मचार्यांनी ५ नोव्हेंबर १४ मध्ये बंदीस्त केले होते. तेव्हापासून हा बिबट्या गडेगाव वनविभागाच्या लाकुड आगारात पिंजर्यात बंदीस्त होता. सहा महिन्याच्या कालावधीनंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक वनविभाग यांनी या बिबट्याला मुंबई बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ६ एप्रिल रोजी त्याला गडेगाव येथून मालवाहू मेटॅडोअरने बोरीवली येथे नेण्यात येत होते. दरम्यान ७ एप्रिल रोजी दुपारी बिबट्याला नेणार्या पथकातील अधिकारी व कर्मचारी आरामासाठी दुपारी १ ते ६ वाजेपर्यंंत विश्रामगृहावर थांबले. त्यामुळे बिबट्यानेही येथील विश्रामगृहात आराम केला. या बिबट्यासमवेत वनसंरक्षक डि.डी. पटले, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.बी. यसनपुरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गुणवंत भडके, वनरक्षक डि.पी. मेश्राम, व्ही.एल. सेलोरकर, वनमजुर देवराम मसराम, वनपाल सरनाईक, वनरक्षक खलारकर असे नऊ जणांचे पथक होते.
‘त्या’ बिबट्याचा मलकापूर विश्रामगृहात आराम!
By admin | Updated: April 8, 2015 01:40 IST