मानोरा : तालुक्यातील तहसील कार्यालय इमारत जुनी झाली आहे. या इमारतीच्या छताला पावसाच्या पाण्यामुळे गळती लागल्याने तहसील कचेरीतील महत्त्वाची कागदपत्रे भिजून खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासन विभागाची ७ ते ८ दालनांची ही प्रशस्त इमारत १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आली. या इमारतीला गेल्या तीन-चार वर्षांपासून गळती लागली आहे. याअगोदरचे तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासोबत पाठपुरावा केला होता. मात्र कोविड संसर्गाचा वाढता प्रकोप यामुळे इमारतीच्या छताची दुरुस्ती होऊ शकली नसावी. दरम्यान, या वर्षीच्या मुसळधार पावसामुळे जवळपास सगळ्याच दालनांत पाणी आले आहे. त्यामुळे कपाटे, फर्निचर यांची पुरती वाट लागली आहे. शिवाय पावसाच्या पाण्याने संगणक नादुरुस्त होण्याची भीती व्यक्त होत असून संगणक निकामे होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना गळक्या स्लॅबखाली बसून पावसाचे पाणी अंगावर झेलावे लागत आहे. नागरिकांनाही त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी दालनात आल्याने अनेकांना तर खुर्चीत बसणेही अवघड झाले आहे. या इमारतीची गेल्या वर्षी गळती होताच उपाययोजना करणे गरजेचे होते. तात्पुरती मलमपट्टी याबाबतीत कुचकामी ठरत आहे.
तहसील कार्यालयामधील काही खोल्यांमध्ये पावसाचे पाणी गळते. गेल्या दोन वर्षांपासून छत व इमारत दुरुस्त करावी याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्र देऊन पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्यापही दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही.
- संदेश किर्दक,
नायब तहसीलदार, मानोरा.