रस्ता रुंदीकरण व सौदर्यीकरण : वृक्ष कायम ठेवण्यासाठी संघटनांचा पुढाकारनंदकिशोर नारे - वाशिमशहर सौदर्यीकरण, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वाशिम शहरातील काही झाडांवर ‘कुऱ्हाड’ चालणार आहे. १३ एप्रिल रोजी नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणी व आखणीमुळे, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी शहरातील विविध संघटना सरसावल्या आहेत. शहराचे सौंदर्यीकरण व भरभरून विकास ही बाब प्रत्येकाच्या मनाला पटणारी आहे. मात्र, अनेक वर्षांपासून उभी असलेली झाले कापून तो शहराचा विकास होत असेल, तर तो न झालेला बरा असा पवित्रा ‘ऋणानुबंध’ बहुउदेशिय संस्थेद्वारा संचालित ‘वसुंधरा वृक्षसंवर्धन संघटना’ व ‘मानद वन्यजिव रक्षक समिती’ने घेतला असून, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ही बाब त्यांच्या लक्षात आणून देणार असल्याची माहिती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. गत दोन वर्षांपूर्वी आंबेडकर चौक ते नगरपरिषद चौक दरम्यान करण्यात आलेल्या रस्तारूंदीकरणादरम्यान ४0 ते ५0 वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्यानंतर या मार्गाच्या कडेला वृक्षारोपण होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. हे उदाहरण समोर असताना, आता आंबेडकर चौक ते सिव्हिल लाईन मार्गावरील वृक्षांवर ‘कुऱ्हाड’ चालविली जाणार आहे. एकीकडे शासनद्वारे कोटयवधी झाडे लावण्याचा उपक्रम राबविला जातो, तर दुसरीकडे शहर विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्ष तोड केली जात आहे. अनेक वर्षांपासून वाशिमकरांना छाया देणाऱ्या वृक्षांचा शहर विकासादरम्यान बळी जाऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून, ही बाब त्यांच्या लक्षात आणून देणार असल्याची माहिती वसुंधरा वृक्षसंवर्धन संघटनेचे सचिव प्रविण जोशी व मानद वन्यजिव रक्षकचे प्रशांत जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाशिम नगरपरिषद नगरअभियंता विजय घुगरे (श्रेणी क) यांच्याशी संपर्क साधला असता, रस्ता रूंदीकरणादरम्यान या मार्गावरील केवळ वाहतुकीला अथडळा निर्माण करणारी झाडेच काढली जाणार असून, अन्य झाडे कायम ठेवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मार्गाच्या दुतर्फा अनेक झाडे जिर्ण झाली असून, ती केव्हाही कोसळून अपघात घडण्याची शक्यता असल्याने या मार्गावरील किमान २५ झाडे कमी करण्यात येणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. रस्ता रुंदीकरण, सौदर्यीकरणाच्या नावाखाली अनेक वर्षांपासून असलेले झाडे तुटणार असल्याने ते पुन्हा उभे करण्यास खूप कालावधी लागणार आहे. ते तुटू नये याकरिता आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहे.- प्रविण जोशी, सचिव, वसुंधरा वृक्षसंवर्धन संघटना, वाशिमवृक्षतोडीमुळे पशुपक्ष्यांचे घर उध्दवस्त होणार आहेत. शहरातील झाडे तुटू नये यासाठी संबधितांनी प्रयत्न करुन रस्ता रुंदीकरण, सौदर्यीकरण करावे. शासन एकीकडे कोटयवधी रुपये खर्च करुन वृक्षारोपण कार्यक्रम राबवित असतांना दुसरीकडे वृक्ष तोड करणे योग्य नाही. यावर फेरविचार होणे गरजेचे आहे.- प्रशांत जोशी, मानद वन्यजिव रक्षक, वाशिम.रस्त्याच्या मधोमध किंवा वाहतुकीच्या जागेत येणारी झाडेच काढावे लागणार आहेत. जवळपास असे २५ झाडांचा समावेश आहे. रस्ता रुंदीकरणासोबतच नवीन वृक्ष लागवड सुध्दा केल्या जाणार आहे. कोणतेही झाड नाहक कापलय जाणार नाही. - विजय घुगरे, नगर अभियंता (श्रेणी ‘क’), वाशिम नगरपरिषद, वाशिम
वृक्षांवर चालणार ‘कुऱ्हाड’!
By admin | Updated: April 14, 2017 20:42 IST