वाशिम : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील नाट्यगृह व टेम्पल गार्डनचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करीत सविस्तर चौकशी करण्याची मागणी आमदार लखन मलिक यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे १९ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली.
वाशिम नगरपालिकेमध्ये अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्यास प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे; परंतु आजपर्यंत नाट्यगृहाचे काम पूर्णत्वास आलेले नाही. नाट्यगृहाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले व ५२.४२ टक्के निधी खर्च झालेला आहे. या कामात अनियमिता झाल्याचा आरोप आमदार मलिक यांनी केला. तसेच टेम्पल गार्डनच्या कामावर देखील ८० टक्के निधी खर्च करण्यात आला असून, ही दोन्ही कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. वाशिम मतदारसंघातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने अत्याधुनिक टेम्पल गार्डन व नाट्यगृहासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता; परंतु शासनाने दिलेल्या निधीचा जनतेच्या हितासाठी उपयोग झालेला नसल्याचा आरोपही आमदार मलिक यांनी केला.
००००
दोषींवर कठोर कारवाई व्हावी
नाट्यगृह व टेम्पल गार्डनच्या बांधकामप्रकरणी सविस्तर चौकशी करावी. चौकशीअंती दोषी आढळून येणाऱ्या संबंधित अधिकारी व अभियंत्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार मलिक यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.