लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकरी यंदाच्या हंगामात विविध संकटांनी बेजार झाले असून, गेल्या आठवड्यात आलेल्या पावसानंतर पडलेल्या धुक्यामुळे वाशिम तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील शेकडो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पिवळे पडून सुकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या संदर्भात शेतकऱ्यांनी माहिती देऊनही कृषी किंवा महसूल विभागाकडून या नुकसानाची पाहणी करण्यात आली नव्हती. लोकमतने १९ सप्टेंबरच्या अंकात शेकडो हेक्टरमधील सोयाबीन सुकले या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच तलाठी व कृषी सहाय्यकांनी शुक्रवारी या शिवाराला भेट देऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली.वाशिम तालुक्यातील खंडाळा खु. येथे जवळपास ४०० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. यात तूर, मुग, उडिद, कपाशी आणि सोयाबीन पिकाचा समावेश आहे. तथापि, एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. या भागांत पावसाळ्याच्या सुरुवातीला कमी पाऊस पडल्याने पीक संकटात सापडले होते. त्यानंतर आॅगस्टमध्ये आलेल्या जोरदार पावसाचा या पिकाला मोठा आधार झाला. हे पीक आता शेंगा, फुलावर असताना गेल्या काही दिवसांपासून सतत पावसाची रिपरिप सुरू झाल्याने या पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे शेतकºयांना कीटकनाशकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. त्यानंतर पुन्हा गेल्या आठवड्यात पावसाने रिपरिप सुरु केली आता पाऊस थांबल्यानंतर खंडाळा खुर्द परिसरात मोठ्या प्रमाणात धुके पडले आहे. या धुक्यामुळे सोयाबीनचे पीक पूर्णपणे पिवळे पडले आहे. त्यामुळे शेंगाही सुकत असून, आता या पिकातून उत्पादनाची कोणतीच आशा शेतकºयांना राहिलेली नाही. त्यामुळे पिकासाठी कर्ज काढून केलेला खर्च पाण्यात गेला असून, शेतकºयांवर आता कर्जाचा डोंगर वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, गावचे सरपंच आणि शेतकºयांनी या नैसर्गिक आपत्तीची पाहणी करण्याची मागणी तलाठी, कृषी सहाय्यकांकडे केली, तसेच वाशिमच्या तहसीलदारांना या प्रकाराची माहिती देऊनही पिकाची पाहणी करण्यात आली नव्हती. लोकमतने या संदर्भात १९ सप्टेंंबर रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर तलाठी, कृषी सहाय्यकांनी शुक्रवारी खंडाळा खु. येथे भेट देऊन पिवळ्या पडलेल्या पिकाची पाहणी केली.
धुक्यामुळे पिवळ्या पडलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:28 IST