महागाईचा आलेख कमी होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या सर्वसामान्यांच्या पदरी मात्र निराशाच पडत आहे. गॅस सिलिंडर रिफिलिंगच्या किमतीत जवळपास दुपटीने वाढ झाली. पेट्रोल, डिझेलच्या किमतीही नवनवा विक्रम प्रस्थापित करीत असल्याचे दिसून येते. इंधन दरवाढ झाल्याने वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली. त्यामुळे साहजिकच जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीतदेखील वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ, खाद्यतेलही पाच टक्क्याने वाढले आहे. डाळी, फळे यांसह सजावटीच्या साहित्यातही वाढ झाल्याने गोरगरिबांचे कंबरडे मोडत आहे. महागाई नवनवा उच्चांक गाठत असल्याने गोरगरिबांचे सण साजरे कसे होतील? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
००००
सर्वसामान्य नागरिकांना महागाईची सर्वाधिक झळ!
कोट
कॉंग्रेसच्या काळात महागाई नियंत्रणात होती. आता मात्र महागाईवर केंद्र सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येते. इंधन दरवाढ, खाद्यपदार्थ, खाद्यतेल, सजावटीचे साहित्य यांसह सर्वच क्षेत्रात महागाईने उच्चांक गाठल्याने गोरगरिबांनी सण, उत्सव साजरे कसे करावे?
- बाबूराव शिंदे,
जिल्हाध्यक्ष, युवक कॉंग्रेस.
........
महागाईची सर्वाधिक झळ गोरगरिबांना बसत आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूच्या किमतीतदेखील वाढ झाली आहे. सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन येण्यासाठी केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण मिळविण्याकरिता योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.
- विनोद पट्टेबहादूर
सरपंच, सुपखेला.
........
चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात दोन भूकबळी ठरतात, ही दुर्दैवी व लाजीरवाणी बाब आहे. महागाईवर नियंत्रण आणण्याऐवजी केंद्र सरकारची विविध धोरणे जणू महागाईला खतपाणीच घालत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गोरगरिबांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
- दिलीप देशमुख,
जिल्हा परिषद सदस्य.
......
महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसमोर आर्थिक पेच निर्माण होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने साहजिकच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडत आहेत. महागाईवर नियंत्रण असायला हवे.
- स्नेहदिप सरनाईक, वाशिम.