कामरगाव (वाशिम): कारंजा तालुक्यातील कामगरगाव परिसरात अनेक वीटभट्टय़ा विनापरवाना सुरू असून, शासनाचे नियम झुगारून चालविण्यात येत असलेल्या या वीटभट्टय़ांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्याशिवाय शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. ेमहसूल विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वीटभट्टय़ा लावणार्यांना दरवर्षी संबंधित ग्रामपंचायतीसोबतच वनविभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी शासकीय अनुज्ञप्ती शुल्क भरून उपविभागीय कार्यालयाकडून परवानगी दिली जाते; मात्र परिसरात काही वीटभट्टय़ा विनापरवाना सुरळीत सुरू आहेत. वीटभट्टीसाठी तीन आणि पाच लाख वीटनिर्मिती क्षमतेचे परवाने दिले जातात. प्रती एक लाख विटांमागे आठ हजार रुपये याप्रमाणे शासकीय दप्तरी रॉयल्टीचा भरणा तसेच कृषक जागेवर लावण्यात येणार्या वीटभट्टीकडून भाडेसुद्धा आकारले जाते. विटासाठी लागणारी माती आणि पाणी वापरण्याचेही नियम आहेत. हे नियम लक्षात घेऊन उत्खननापासून माती काढावी लागते. महसूल विभागाने भरून घेतलेल्या रॉयल्टीनुसारच उत्पादन काढणे आवश्यक असते; परंतु विटाचे वाढीव उत्पादन करून शासनाचा महसूल बुडविण्याचे कामसुद्धा वीट उत्पादकांकडून सुरू आहे. वीटभट्टीचा मालक या सर्व नियमाचे पालन करतो की नाही, याबाबत तपासणी करण्याची जबाबदारी महसूल विभागाच्या कर्मचार्यांची असते; मात्र तसे होत नाही. परिसरातील वीटभट्टय़ातून लाखो विटांचे विनापरवाना उत्पादन सुरू असताना केवळ हितसंबंधापोटी सर्व आलबेल असल्याचे दिसून येते. तलाठी, ग्रामसेवक, महसूल अधिकारी यांना माहिती असतानासुद्धा सर्रास विनापरवाना वीटभट्टय़ा सुरू असताना अभय कुणाचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कामरगाव परिसरात अवैध वीटभट्टय़ा
By admin | Updated: November 9, 2014 01:07 IST