लोकमत न्युज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत परिचारिका नंदा चौधरी यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर रुग्णांची अविरत सेवा करण्याचा वसा घेतला आहे. गेल्या ४८ दिवसांपासून एकही रजा व साप्ताहिक सुटी न घेता त्या आपले कर्तव्य बजावत असून, मुली तू घरी कधी येणार, असा प्रश्न करणाºया आईला, मी घरी परतेन; पण कोरोनाला हरवूनच, असे उत्तर त्यांनी दिले आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागताच केंद्रशासनाने २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जारी केले. तेव्हापासूनच आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका नंदा महादेव चौधरी या ३६ वर्षीय परिचारिका रुग्णसेवेसाठी धडपडत आहेत. येथील क्वारंटिन कक्षात दररोज ९ ते १० तास त्या सेवारत असतातच शिवाय कर्तव्याची वेळ संपल्यानंतर कधीही बोलावणे आले की, कक्षात हजर होतात. त्या आसेगावनजिकच असलेल्या चिंचखेडा येथील रहिवासी असून, आसेगाव आरोग्य केंद्र परिसरातील आरोग्य कर्मचाºयांसाठी असलेल्या निवासस्थानात त्यांचे सद्यस्थितीत वास्तव्य आहे. देशात लॉकडाऊन जारी होताच त्यांनी आपल्या आईला गावी रवाना केले. तेव्हापासून गेल्या ४८ दिवसांत त्यांनी आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर सोडला नाही. त्या घरी येत नसल्याने त्यांच्या आईने ‘तू घरी कधी येणार, असे विचारले की, ‘मी घरी परतेन; परंतु कोरोना विषाणूला हरवूनच’, असे निर्धारपूर्वक उत्तर त्या देतात. या परिचारिकेची सेवा इतर आरोग्य कर्मचाºयांसाठी आदर्श ठरावी, अशीच आहे.
मी घरी परतेन; पण कोरोनाला हरवूनच; आसेगावच्या परिचारिकेचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:44 IST