लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक हिंगोली रोडस्थित एका पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. चोरटे हे हिंगोली रोडस्थित एका पेट्रोलपंपावर सशस्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती ११ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस प्रशासनाने तीन पथके तयार करीत १२ डिसेंबर रोजी रात्री १२.३० ते २.३० वाजेदरम्यान पेट्रोलपंप परिसरात सापळा रचला. पेट्रोलपंपासमोरील रस्त्याच्या पलीकडे एका लोखंडी पत्राच्या शेडमागे लाल रंगाची एक कार संशयास्पद स्थितीत आढळून येताच, पोलिसांनी तेथे छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागल्यानंतर काही इसम कारमधून पळून जाण्यात यशस्वी झाले, तर तीन इसमांना पाठलाग करून ताब्यात घेतले. अन्य दोन इसम अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. ताब्यात घेतलेल्या दीपक रतन बनसोड (३२, रा. काटा, ता. जि. वाशिम), इरफान अंबीर शहा (२४, रा. मांगूळ झनक, ता.रिसोड), शहीनशहा वजीर शहा (३१, रा. मेहकर जि.बुलडाणा) यांची झडती घेतली असता १ तलवार, २ खंजिर, लाल मिरची पावडर, एक २० फूट लांब दोरी, ६ मोबाइल व वाहन असा एकूण ४ लाख ३२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला. उपरोक्त आरोपी व पळून गेलेले साथिदार यांच्याविरुद्ध वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम ३९९, ४०२ सह कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांचे नेतृत्वात पोलीस चमूने पार पाडली.
पेट्रोलपंपावर सशस्र दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 11:26 IST
Robbers Arested टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले.
पेट्रोलपंपावर सशस्र दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद
ठळक मुद्दे गुप्त माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांना मिळाली होती.कार संशयास्पद स्थितीत आढळून येताच, पोलिसांनी तेथे छापा टाकला.