अकोला: रतनलाल प्लॉट चौकातील केतकर हॉटेलमधील वृद्ध दाम्पत्यास लोखंडी पाइपने मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड अनिल घ्यारे याला जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच २५ हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी दीड वर्षांच्या कैदेची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणातील गोलू नामक आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खदान नाका येथील रहिवासी योगिनी पारडे व तिचे पती शंकर पारडे हे दोघे जण रतनलाल प्लॉट चौकात केतकर हॉटेल चालवत होते. २७ जून २0१४ रोजी आंबेडकरनगर येथील रहिवासी नीलेश ऊर्फ गोलू रामदास अंभोरे (२२) याने सकाळी ९ वाजता नाष्टा केला व पैसे न देता शंकर पारडे यांना शिवीगाळ करून निघून गेला. त्याच दिवशी दुपारी १ वाजताच्या सुमारास कुख्यात गुंड अनिल गजानन घ्यारे हा केतकर हॉटेलमध्ये आला. यावेळी शंकर पारडे हे बाजारात गेले होते, तर त्यांची पत्नी योगिनी पारडे या हॉटेल सांभाळत होत्या. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील राजाकिन्ही येथील रहिवासी व योगिनीचे सासरे भीमराव नारायण पारडे व सासू सुमन भीमराव पारडे हेदेखील हॉटेलमध्ये बसले होते. अनिल घ्यारे याने योगिनीकडे हॉटेलचा मालक कोण, अशी विचारणा केली. योगिनीने तिचे सासू-सासरे हेच हॉटेलचे मालक असल्याचे दाखवताच अनिलने भीमराव पारडे यांच्या पायावर लोखंडी पाइपने हल्ला चढविला. यावेळी सुमन पारडे या अनिलला रोखण्यास गेल्या असता, त्याने त्यांच्या डोक्यावर पाइपने वार केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सवरेपचार रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर योगिनी पारडे यांच्या तक्रारीवरून अनिल गजानन घ्यारे व शैलेश ऊर्फ गोलू अंभोरे या दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ३0७, ३२६, ३२५, ४५२, ५0४, ५0६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी यू.व्ही. श्ेरजे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने आठ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी अनिल घ्यारे याला कलम ३२६ अन्वये पाच वर्षांची शिक्षा व २0 हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.
कुख्यात गुंड अनिल घ्यारेला पाच वर्षांचा सश्रम कारावास
By admin | Updated: January 20, 2016 02:01 IST