संतोष वानखडे
वाशिम : शहरी भागासह ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळात असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने २६ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले. याची दखल घेत बोगस डॉक्टरांचा तातडीने शोध घ्या, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी तालुकास्तरीय समितीला २६ आॅगस्ट रोजी दिले.
वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एका दवाखान्यात विलास ठाकरे नामक बोसग डॉक्टरकडून अवैध गर्भपाताचा प्रयत्न झाल्याने आरोग्य क्षेत्र ढवळून निघाले. अधिकृत डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काही वर्षे सेवा दिल्यानंतर, या अनुभवाच्या जोरावर अनेक जण ग्रामीण भागात दवाखाना थाटतात. शहरी भागातही काही जण बोगस पदवी दाखवून रुग्णांवर उपचार करतात. मानोरा, कारंजा, मंगरूळपीर तालुक्यात बोगस डॉक्टरासंदर्भात तक्रारी झाल्या तसेच यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेचे लक्ष वेधले. याची दखल घेत तालुकास्तरीय समितीला पत्र देत बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिले.