लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : येथील नगर पंचायतच्या कायम मुख्याधिकारी पदाचा प्रश्न अखेर निकाली लागला असून, या ठिकाणी डॉ. विकास खंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या मुख्याधिकाºयांसमोर आता शहराच्या विकासाचे मोठे आव्हान असणार आहे.तालुक्याचा दर्जा असलेल्या परंतु ग्रामपंचायत प्रशासन असलेल्या मालेगावचे जवळपास साडे तीन वर्षांपूर्वी नगर पंचायतमध्ये रुपांतर झाले. त्यामुळे दर्जानुसार विकास होण्याच्या अपेक्षा नागरिकांना होत्या; परंतु पुरेशा निधीअभावी या शहराचा म्हणावा तेवढा विकास अद्यापही झाला नाही. त्यातच नगर पंचायत कार्यालयात पदस्थापनेनुसार अधिकारी, कर्मचाºयांची अनेक दिवस वाणवा होती. त्यातच येथे कायम मुख्याधिकारीही नव्हते. रिसोड पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्याकडे दोन वर्षे येथील अतिरिक्त प्रभार होता. त्यामुळे विकास कामांचा वेगही मंदावला. आता येथे कायम मुख्याधिकारी म्हणून डॉ. विकास खंडारे यांची नियुक्ती झाली आहे. सद्यस्थितीत मालेगाव शहरात ५० हजार ते एक लाख रुपयांच्यावर कर थकित असलेल्यांची संख्या लक्षणीय असून, अपेक्षीत उत्पन्नाअभावी शहरात विकास कामे करणे कठीण आहे, तसेच शहरात विकासासाठी दलीतवस्ती सुधार योजने अंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. त्यातील काही कामे सुमार दर्जाची आहेत. मार्च अखेरपर्यंत थकित कर वसुली करण्यासह विकास कामांचा दर्जा राखून ती वेगाने पूर्ण करण्याचे आव्हान नव्या मुख्याधिकाºयांसमोर असणार आहे. त्याशिवाय शहरातील विकास कामांसाठी प्राप्त झालेल्या सव्वा दोन कोटींच्या निधीतून विविध रस्त्यांसह इतर विकास कामे पूर्ण करण्याचे आव्हानही त्यांच्यापुढे असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी प्रस्तावित ३५ कोटींची योजना मंजूर करून आणून ती शहरात कार्यान्वित करण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असून, या आव्हानांना तोंड देतानाच शहरातील स्वच्छता राखून, शौचालये, मुत्रीघरांची उभारणी करण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)
अखेर मालेगावला मिळाले कायम मुख्याधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 17:41 IST