वाशिम : पुरोगामी महाराष्ट्राचा डांगोरा पिटणार्या राजकीय पक्ष व राजकारण्यांचे ह्यपुरोगामित्वह्ण किती बेगडी आहे, याची प्रचिती आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीने आणून दिली आहे. पितृपंधरवाड्यात म्हणजेच २0 सप्टेंबरला निवडणूकीची अधिसुचना निघाली अन् त्याच दिवसांपासून नामांकन दाखल करण्याला प्रारंभ झाला. मात्र, बोट्यावर मोजण्या इतक्यांचा अपवाद वगळता अंधश्रद्धा व बुरसटलेल्या रितीरिवाजाच्या जोखंडात अडकलेल्या उमेदवारांनी पितृपंधरवाड्यात नामांकन दाखल करण्याला सोयीस्कर बगलच दिली आहे. दाखल नामांकनाच्या आकडेवारीने ही बाब अधोरेखित केली आहे. नामांकन दाखल करण्याच्या दिवसापासून तर २४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात केवळ सहा उमेदवारांनी निवडणूकीसाठी नामांकन दाखल केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एकाही प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचा समावेश नाही. पितृपंधरवाड्यात अनुसुचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित असलेल्या वाशिम मतदार संघात तर गत चार दिवसात एकही नामांकन दाखल झाले नाही. रिसोड मतदार संघात एक तर कारंजा मतदारसंघात सर्वाधिक पाच नामांकन दाखल झाले आहेत.
नामांकनावर पितृपक्षाचे सावट
By admin | Updated: September 25, 2014 01:23 IST