मंगरुळपीर (जि. वाशिम) : तालुक्यातील ग्राम पिंप्री अवगण येथे खरीप हंगामात अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकर्यांच्या हातात नगदी येणारे सोयाबीनची पिके गेली आहेत. त्यामुळे कोरडवाहु शेतकर्यांवर यंदा आर्थिक संकट कोसळले असून, पाण्याअभावी व तापत्या उन्हामुळे करपून गेलेल्या पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी पिंप्री अवगण येथील शेकडो शेतकरी तहसीलवर धडक देऊन तहसीलदाराकडे निवेदन दिले. गेल्या तीन ते चार वर्षांंपासून एकापाठोपाठ कोसळणार्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत सापडला आहे. पिंप्री अवगण परिसरात यंदाचा खरीप हंगाम नुकसानदायक ठरला आहे. पेरणीच्या वेळी पावसाने साथ दिली; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन पिकांना अपुर्या पावासाचा प्रचंड फटका बसला. मागील कित्येक दिवसांपासून पाऊस थांबल्यामुळे उभी पिके करपु लागली आहेत. पिंप्री येथील शेतकर्यांकडे ओलीताची पाहिजे तेवढय़ा प्रमाणात सोय नसल्यामुळे गरजेच्या वेळी पिकांना पाणी देता येत नाही. पिकांना अपुर्या प्रमाणात मिळालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या झाडाला शेंगा दिसत आहेत; परंतु उत्पन्न मात्र मिळणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सोयाबीनची सोंगणी करणे परवडण्यासारखे नाही. म्हणून महसूल विभागाच्यावतीने सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकर्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. निवेदनावर उपसरपंच नारायण आडे, देवीदास राठोड, शेषराव अवगण,वसंता राठोड,रामप्रकाश राठोड, गौतम वर, प्रेम राठोड,बबन येवले,भारत तायडे, सदाशिव राठोड,यशोदा तायडे,विठठल भोयर, आनंदा अवगण,अन्नपूर्णा तायडे,थावरा राठोड, सुधाकर तायडे, गब्बासीग राठोड,वामन राठोड,राजू अवगण, नामदेव अवगण, केशव कोकरे, बापुराव अवगण, सुधाकर राठोड, मधुकर तायडे, हिरासींग राठोड, तारासींग राठोड, मोतीराम पवार, सुरेश तायडे, विठोबा येवले, सुभाष तायडे,प्रल्हाद राठोड, किसन राठोड, प्रभाबाई तायडे, देमाजी तायडे, येवले, कुंडलीक वर यांच्यासह शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
नुकसान भरपाईसाठी शेतकरी तहसीलवर धडकले!
By admin | Updated: September 9, 2015 01:50 IST