वाशिम: बदलत्या काळानुसार शेतकर्यांनी शेती करण्याच्या पद्धतीतही बदल केला पाहिजे. आताच्या काळात गहू, तांदूळ, ज्वारी लावून फारसा उपयोग नाही तर अधिकाधिक उत्पादनासाठी शेतीमधील विविध टाकाऊ मालापासून सेकंड जनरेशन इथेनॉलची निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी स्थानिक रिसोड नाक्याजवळ आयोजित वाशिम-हिंगोली जिल्ह्यातील रस्ते विकास कामांचे कोनशिला अनावरणप्रसंगी केले. निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकर्यांसमोर नानाविध संकटे उभी राहत आहेत. शेतकर्यांनी आता शेती व बाजारपेठेचा अभ्यास करून अधिकाधिक उत्पादन देणार्या शेतमालाकडे वळले पाहिजे. शेतातील तुराट्या, पर्हाट्या, ऊसाचे चिपाड, आदी टाकाऊ मालापासून सेकंड जनरेशन इथेनॉलची निर्मिती होते. सध्या पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉलचा वापर केला जातो. यापुढे १0 टक्के वापर करण्याचे प्रस्तावित केले जाणार आहे. त्यामुळे इथेनॉलची मागणी वाढेल. इथेनॉलचा वापर करून नागपुरात १00 एअर कंडिशनर बसेस धावत आहेत. या सेकंड जनरेशन इथेनॉलपासून ह्यबायो-प्लास्टिकह्णची निर्मिती केली जाते. त्यामुळे ग्रामीण भागात उद्योग निर्मिती करून रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचे ना. गडकरी म्हणाले. शेतकर्यांनी इथेनॉलची शेती करावी, असा सल्लाही गडकरी यांनी दिला. सर्व महामार्गांवर प्रत्येक ५0 किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप, हॉटेलसह तेथील स्थानिक शेतीमालाची विक्री केंद्र उभारून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर प्रत्येक १00 किलोमीटर अंतरावर ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठीसुद्धा प्रयत्न केले जात असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी ना. गडकरी यांनी वाशिम जिल्ह्याला खूप काही भरभरून दिल्याचे सांगितले. वाशिम जिल्ह्यातील सिंचन अनुशेष, पुणे-मुंबईप्रमाणे मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग यासह अन्य प्रश्नही मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी खासदार भावना गवळी, प्रतापराव जाधव, राजीव सातव, आमदार लखन मलिक, तानाजी मुटकुळे यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले. यावेळी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजय जाधव, पुरूषोत्तम राजगुरू, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांच्यासह भाजपा-सेना पदाधिकारी व जनसमुदायाची उपस्थिती होती.
शेतक-यांनो, इथेनॉल निर्मितीची शेती करा!
By admin | Updated: April 5, 2016 01:42 IST