वाशिम : जलसंधारणाच्या कामांना जलद गतीने पार न पाडणे आणि वारंवार गैरहजर राहिल्याच्या कारणावरून लघू सिंचन जलसंधारणच्या कार्यकारी अभियंत्याला अमरावती मंडळाच्या सहायक अधीक्षक अभियंत्यांनी शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. लघू सिंचन जलसंधारण विभागातर्फे विविध कामे केली जातात. तसेच लघू सिंचन प्रकल्पांना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार जलसंधारणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सोपविले आहेत. या विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून एस.एस. धनशेट्टी कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागाने सहा लघू सिंचन प्रकल्पांचे प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी धनशेट्टी यांच्या दरबारात २५ दिवसांपूर्वी ठेवले होते. या कामांवर मार्च २0१६ पर्यंत प्रस्तावित निधी खर्च करावयाचा असल्यामुळे तांत्रिक मान्यता मिळणे आवश्यक आहे. तांत्रिक मान्यतेस विलंब होत असल्याचे पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष जोगदंड यांनी धनशेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, भ्रमणध्वनी बंद असल्याचे समजले. त्यानंतर कार्यालयातही ते आढळून आले नाहीत. जिल्हाधिकार्यांनीदेखील यापूर्वी धनशेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत. या प्रकाराची जिल्हा परिषद अध्यक्षांनी अमरावती मंडळाच्या सहायक अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा म्हणून धनशेट्टी यांच्या कार्यालयात संपर्क साधला, ते उपलब्ध झाले नाहीत, तसेच भ्रमणध्वनीद्वारे निम्न स्वाक्षरीतांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो बंद असल्याचा संदेश मिळाला. एकंदरित कार्यकारी अभियंता कार्यालयात उपलब्ध नसल्याने कामे ठप्प झाली, तसेच सहा लघू सिंचन प्रकल्पांची तांत्रिक मान्यता रखडल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनात आले. वरिष्ठांना कल्पना न देता गैरहजर राहणे आणि विविध कामे खोळंबण्यास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून अमरावती मंडळाच्या सहायक अधीक्षक अभियंत्यांनी धनशेट्टी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसनुसार, कामांना जलद गतीने पार न पाडल्यामुळे व वारंवार गैरहजर राहिल्यामुळे तसेच कार्यालयीन दूरध्वनी न स्वीकारल्यामुळे शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये? याबाबत आपले स्पष्टीकरण तीन दिवसांच्या आत सादर करावे, आपले स्पष्टीकरण संयुक्तिक न वाटल्यास नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. १६ फेब्रुवारी २0१६ पासून गैरहजर असल्यामुळे जलसंधारणाचे व जलयुक्त शिवार या विकास कामांच्या प्रगतीमध्ये खोळंबा निर्माण झालेला असून, अंदाजपत्रकांना मान्यता देणे, तसेच मंत्रालय, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, प्रादेशिक कार्यालय तसेच विभागीय कार्यालय या कार्यालयांचा तातडीचा पत्रव्यवहार न झाल्यामुळे कामे ठप्प झालेली आहेत. त्यामुळे हे पत्र प्राप्त होताच तत्काळ कार्यालयात हजर होऊन तसे मंडळ कार्यालयास अवगत करावे, अशी सूचनाही अमरावती मंडळाच्या सहायक अधीक्षक अभियंत्यांनी दिली आहे.
जलसंधारणच्या कार्यकारी अभियंत्याला ‘शो-कॉज’
By admin | Updated: February 25, 2016 01:50 IST