वाशिम: ५0 टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे; मात्र यामध्ये आत्महत्याग्रस्त वाशिम जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश करण्यात आला नाही. जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ असून, जिल्हय़ातील शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. त्यानंतरही जिल्हय़ाची पैसेवारी ५५ पैसे दर्शविण्यात आली असून, यामुळे जिल्हय़ाला वगळण्यात आले आहे. गत पंधरा वर्षांत या जिल्हय़ात २00१ पासून ते आजपर्यंत १५ वर्षामध्ये एक हजार १८६ शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. वाशिम हा आकारमानाने छोटा जिल्हा असून, अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आत्महत्या सर्वात जास्त आहे. गत तीन वर्षांंपासून जिल्हय़ात कधी अतवृष्टी तर कधी अल्पवृष्टीमुळे जिल्हय़ात दुष्काळ कायम आहे. रब्बी व खरीप दोन्ही हंगामात शेतकर्यांना नुकसानाचा सामना करावा लागला. जिल्ह्यात नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या क पाशीवर मात करून सोयाबीनचे क्षेत्र वाढले. मात्र यावर्षी पेरणीच्या सुरवातीला पावसाने दगा दिल्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे दुबार पेरणी केलेल्या पिकांना पोषक वातावरण मिळाले नाही. परिणामी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकर्यांचा शेतीला लावण्यात आलेला खर्चसुद्धा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नजर आणेवारी ५५ पैसे असली तरी अंतिम आणेवारी ही ५0 टक्क्यांपेक्षा खाली येणे अपेक्षित असल्याने शासन याबाबत सुधारित निर्णय घेते का, याकडेही लक्ष लागले आहे.
दुष्काळातून आत्महत्याग्रस्त वाशिमलाच वगळले
By admin | Updated: October 19, 2015 01:54 IST