सुनील काकडे। लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सामाजिक न्याय विभागाकडून चालविल्या जाणार्या येथील शासकीय बहूद्देशीय संमिश्र अपंग केंद्रात वास्तव्याला असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याकामी प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. हात, पाय यासह इतर शारीरिक व्याधींनी त्रस्त असतानाही जीवन जगण्याची धडपड करणार्या या विद्यार्थ्यांना गाळ साचलेल्या सिमेंटच्या टाक्यात साठविल्या जाणारे विहिरीचे अशुद्ध पाणी प्यावे लागत असून, शौचालयांअभावी पायर्या उतरून बाहेर उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये उजागर झाला.शासकीय बहूद्देशीय संमिश्र अपंग केंद्रात यावर्षी २८ विद्यार्थी वास्तव्याला असून, अधिकांश विद्यार्थ्यांना पायाचा व्यंग असल्याने धड चालताही येत नाही. असे असताना सर्वच विद्यार्थ्यांना इमारतीमधील दुसर्या मजल्यावर एका हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे, तर विद्यार्थ्यांच्या आंघोळीची सोय चक्क तिसर्या मजल्यावर करण्यात आली आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून चालविल्या जात असलेल्या या वसतिगृहात अद्याप एकही शौचालय उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे हात-पायांनी अधू असताना, डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नसताना रात्री-बेरात्री गाजर गवतासह इतर झाडेझुडुपे वाढलेल्या पटांगणात शौचास जावे लागते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. वसतिगृहाच्या तिसर्या मजल्याच्याही वर असलेल्या सिमेंटच्या जुनाट टाक्यामध्ये विहिरीचे पाणी साठवून ते पाणी विद्यार्थ्यांना पाजले जात आहे. या टाक्याची पाहणी केली असता, त्यात मोठय़ा प्रमाणात गाळ साचल्याचे निदर्शनास आले. यासह पाण्यावर दूषित घटकांचा तरंग आल्याचेही स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून आले. हे पाणी निर्जंंतुक करण्याची कुठलीच सोय अद्याप या वसतिगृहात उभारल्या गेलेली नाही. विद्यार्थी ज्या हॉलमध्ये झोपतात, त्या हॉलचीही दुरवस्था झाली असून, गाद्या प्रचंड प्रमाणात मळालेल्या आहेत.
कित्येक आले-गेले; प्रश्न नाही सुटले!शासकीय बहूद्देशीय संमिश्र अपंग केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गराड्यात दोन्ही पायांनी अधू असलेल्या एका निरागस विद्यार्थ्याने यावेळी बिनदिक्कतपणे वस्तुस्थिती विशद केली. तो म्हणाला, आजपर्यंंत कित्येक आले आणि केवळ फोटो काढून गेले; पण आमचे मूलभूत प्रश्न आजही कायम आहेत. तथापि, त्याच्या या वक्तव्याची दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.