वाशिम: जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्यावतीने आज ११ मार्चला आयोजित कार्यशाळेला एकाही तालुक्यातील गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित नव्हते. या अधिकार्यांनी कार्यशाळेला दांडी मारल्याने हा सप्ताह कसा राबविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १६ ते २२ मार्च दरम्यान पेयजल व स्वच्छता जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान प्रत्येक गावात किमान ९0 शौचालयाचे बांधकाम करणे अपेक्षित आहे. हा सप्ताह कशा पद्धतीने राबवायचा, याबाबत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), बालविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका समन्वयक, उपअभियंता यांना आमंत्नित करण्यात आले होते. याबाबत सविस्तर मार्गदर्शनही या कार्यशाळेत करण्यात आले; मात्न या योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनीच या कार्यशाळेला दांडी मारल्याने या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोण स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे प्रकृती अस्वस्थ असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी हे कार्यक्रमाला उपस्थित राहु शकले नाहीत; तसेच या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे रजेवर गेल्याने तेही या कार्यशाळेत हजर नव्हते. याचाच परिणाम म्हणून या कार्यशाळेला गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी उपस्थित राहण्याची तसदी घेतली नसल्याचा अंदाज उपस्थित सहभागींनी वर्तविला. याबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सोनाली जोगदंड आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी आपली खंत बोलुन दाखवली.
बिडीओ आणि विस्तार अधिका-यांची दांडी
By admin | Updated: March 12, 2015 02:01 IST