कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले असून, ते कधी संपेल हे कुणीही सांगू शकत नाही. पहिल्या लाटेपेक्षाही दुसरी लाट प्रचंड वेगाने वाढत असून, तिचा वेग हा असाच वाढत राहिल्यास फार मोठे संकट आरोग्य विभागावरच नव्हे तर सगळ्यांवरच येणार आहे. त्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्यात दररोज ३०० पेक्षाही अधिक रुग्ण वाढत आहेत. काही गावामध्ये तर कोरोनाने थैमान घातले आहे. पहिल्या लाटेत वयस्कर व ज्यांना मधुमेह, रक्तदाब, दमा अशाप्रकारचे आजार आहेत, त्यांचे मृत्यूचे प्रमाण जास्त होते. यावेळेस मात्र हा आजार सर्वच वयातील लोकांना होत आहे. मालेगाव तालुक्यामध्येही भयावह परिस्थिती आहे. दररोज सरासरी १०० वर रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. कमी लक्षणे असलेल्या व श्वासाचा त्रास नसलेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांच्यामध्ये विषाणूचे प्रमाणही अल्प असते. थोडी फार लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्वरित आपली कोरोना टेस्ट करून घेऊन उपचार सुरू केल्यास ते रुग्ण बरे होऊ शकतात. मात्र अशाप्रकारच्या प्राथमिक उपचारासाठीसुद्धा रुग्णांना मालेगाव येथे व्यवस्था नसल्याने वाशीम येथे जावे लागते. त्यामुळे वाशीमचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तेथे सर्वांनाच सुविधा पुरविणे कठीण झाले असल्याचे चित्र आहे. अनेक रुग्णांना तर हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याने बाहेरच उपचार करून घ्यावे लागत आहेत. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक असेल त्यांनाच वाशीम येथे पाठवावे व त्याखालील रुग्णांचा उपचार स्थानिक पातळीवरच झाल्यास रुग्णांची सुविधा होईल. वाशीम येथे उपचारासाठी जाण्यास अनेक जणांची हिंमत होत नाही तर काही पैशाच्या अडचणीमुळे जाऊ शकत नाही. त्यासाठी मालेगाव शहरामध्ये किमान २०० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी शहरातील अनेक शाळांपैकी एखादी शाळा शासनाने ताब्यात घ्यावी, कारण सध्या शाळाही बंद आहेत. या सेंटरमध्ये शासनाने वैद्यकीय व्यवस्था व सेवा पुरवावी तसेच शहरातील व परिसरातील खासगी डॉक्टरांची सेवा तेथे घ्यावी. कोविड सेंटरमध्ये लागणाऱ्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या. या आणीबाणीच्या व देशावर आलेल्या संकटकाळामध्ये सर्वांनीच आपापल्यापरीने मदत केल्यास शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी होऊन रुग्णांनाही चांगली सेवा मिळेल, यात शंका नाही.
मालेगाव तालुक्यात कोविड सेंटर उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:42 IST