मंगरुळपीर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच इग्नु या विद्यापिठाने फलज्योतिष हा विषय पदवी व पदवीका अभ्यासक्रमाला शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वाशिम जिल्हा शाखेच्यावतीने निषेध करण्यात येवून महाराष्ट्रात फलज्योतिष हा विषय शिकविण्यास मान्यता देवू नये, अशा विनंतीचे निवेदन मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचेमार्फत देण्यात आले.
समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी इग्नुच्या या फलज्योतिष या विषयाच्या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र राज्यात मान्यता देवू नये, असे निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष नाना देवळे, जिल्हा संघटक विजय भड, नीलेश मिसाळ, नंदू वाघ - वाशिम तालुका संघटक, पुरुषोत्तम म्हातारमारे, महादेव साबळे, यांसह जिल्ह्यातील इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.