वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२०मध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळल्यानंतर ९ सप्टेंबर २०२१पर्यंत एकूण ४१,७२८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी ४१,०७३ रुग्णांनी काेरोनावर मात केली, तर ६३८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अद्यापही १६ रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यात बरे झालेल्यांपैकी अनेकांना विविध आजार उद्भवत असून, यात त्वचेसंबंधी काही आजारांचीही भर पडली आहे. त्यात पुरळ (मॉरबिलीफॉर्म), (एरिथेमेटस), पित्तासारखे चट्टे, (आर्टीकेरिअल रॅशेस) आदींचा समावेश आहे. यामुळे त्वचेला विकृत रुप प्राप्त होत असल्याने प्रामुख्याने महिलांच्या समस्येत अधिक भर पडली आहे. अनेक महिला त्वचेचा विकार दूर करण्यासाठी सौंदर्यतज्ज्ञ, त्वचाविकार तज्ज्ञांकडे उपचारासाठी येत आहेत.
------------
काेरोनानंतर उद्भवलेले त्वचेचे आजार
१) पुरळ (मॉरबिलीफॉर्म)
प्रामुख्याने चेहऱ्यावर गाल आणि कपाळावर हा पुरळ येत आहे. साधारणत: मुरुमासारखा दिसणाऱ्या या पुरळामुळे चेहऱ्याला विकृती येत आहे. उपचारानंतर मात्र हा पुरळ नाहीसाही होत आहे.
०००००००००००००००००००००
२) पित्तासारखे चट्टे (आर्टीकेरिअल रॅशेस)
या विकारात त्वचेवर पित्तासारखे चट्टे पडतात. चट्टे पडलेल्या भागातील त्वचा लाल होते. मोठ्या प्रमाणात खाजही सुटते. त्यामुळे रुग्ण त्रस्त होतो. साधारण महिनाभराच्या उपचारानंतर या आजारावर मात करणे शक्य होते. अनेक पुरुष आणि महिलांना हा त्रास जाणवत आहे.
-------
त्वचेवर होणाऱ्या परिणामांची कारणे
कोरोना संसर्गादरम्यान दीर्घकाळ झालेल्या उपचारांत औषधांच्या झालेल्या अति माऱ्यामुळे प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊन आता विविध आजार उद्भवत आहेत. त्यात त्वचेसंबंधी आजारांचाही त्रास होत आहे. काहीकाळ उपचार केल्यानंतर या आजारांवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळते.
००००००००००००००००००००००००
आजारावर औषधांसह घरगुती उपाय
कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर होणाऱ्या त्वचा विकारांवर उपचारासाठी त्वचाविकार तज्ज्ञ, सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार घेतानाच वांगी, गवार, टोमॅटो, शेंगदाणे, हरभरा डाळ, आदी डॉक्टरांनी सांगितलेले पथ्यकारक पदार्थ वगळून ताजा हिरवा भाजीपाला, मोड आलेल्या धान्याचे सेवन केल्यास नियंत्रण मिळते.
००००००००००००००००००
कोट : कोविड-१९ आजारानंतर अनेक रुग्णांना त्वचेचे विकार दिसत आहेत. त्यात मॉरबिलीफॉर्म, एरिथेमेट्स, आर्टीकेरिअल रॅशेसचा समावेश आहे. या त्वचा विकारांवर उपचार करणे शक्य आहे, तसेच घरी काही पथ्य पाळून व पौष्टिक धान्य, भाजीपाल्याचे सेवन करूनही त्यावर नियंत्रण मिळवता येते. फारच त्रास असेल, तर ॲलर्जीची चाचणी करणे उत्तम ठरते.
- डॉ. नीलिमा चव्हाण
त्वचाविकार तथा सौंदर्यतज्ज्ञ