लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, १५ मे रोजी आणखी १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ५७८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३५,२६३ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कडक निर्बंधाच्या कालावधीतदेखील कोरोनाचा आलेख चढताच असल्याचे दिसून येते. कडक निर्बंधाच्या सात दिवसाच्या कालावधीत ३,१८८ रुग्ण आढळून आले आहेत. कडक निर्बंधापूर्वीच्या सात दिवसातही जवळपास ३१०० रुग्ण आढळून आले होते. शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कारंजा तालुक्यात आढळून आले आहेत. शुक्रवारी वाशिम तालुक्यात १७३ रुग्ण तर शनिवारी १२८ रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरी भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. कारंजा व वाशिम शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दुसरीकडे मृत्यूसत्रही सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शनिवारच्या अहवालानुसार उपचारादरम्यान १० जणांचा मृत्यू झाला. एकूण ५७८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १२८, मालेगाव ९५, रिसोड ४८, मंगरूळपीर तालुक्यातील ६७, कारंजा १३२ आणि मानोरा तालुक्यात ५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ५१ बाधिताची नोंद झाली आहे.
Corona Cases in Washim : आणखी १० जणांचा मृत्यू; ५७८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 12:31 IST