लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रेतीअभावी विविध प्रकारची बांधकामे ठप्प असून रिसोड तालुक्यासह जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी असंघटीत बांधकाम कामगारांनी २५ जानेवारी रोजी रिसोड तहसिल कार्यालयावर धडक दिली. जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील रेती उपसा करण्यायोग्य सर्व रेतीघाटांचा लिलाव अद्याप झालेला नाही. विविध ठिकाणच्या रेती घाटांची शासनाच्या किंमतीनुसार सुधारीत किंमत काढून त्याचे लिलाव करण्यात यावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने विविध प्रकारच्या बांधकामांसाठी रेती उपलब्ध नाही. पर्यायाने बांधकामे ठप्प असून, बांधकाम कामगारांनादेखील रोजगार उपलब्ध नाही. रोजगाराअभावी अन्यत्र स्थलांतरण करण्याची वेळ आली असून, बांधकाम व्यवसायाशी निगडीत वाहनधारक, प्लंबर, इलेक्ट्रिशीयन, सिमेंट व अन्य साहित्य विक्रीचे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करून रेतीघाटांचे लिलाव करण्यात यावे, रेती उपलब्ध करावी, अशी मागणी असंघटीत बांधकाम कामगारांनी २५ जानेवारीला केली. तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यावेळी असंघटीत बांधकाम कामगार, बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व कामगार, व्यावसायिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
रेतीघाट लिलावासाठी बांधकाम कामगार धडकले रिसोड तहसिलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:11 IST