वाशिम : येथील रूची सोया फॅक्टरीमधील प्राण्यांसाठी तयार करण्यात येणार्या खाद्याची (डी.ओ.सी.) चोरी करणार्या मालवाहु वाहतूकदारास पोलिसांनी रंगेहात पकडले. ही घटना १ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. सुरकंडी परिसरात असलेल्या रूची सोया फॅक्टरीमध्ये प्राण्यांसाठी खाद्य तयार करण्यात येते. हे खाद्य रेल्वे द्वारे इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवले जाते. गेल्या आठ दिवसापासून रेल्वे वॅगनमध्ये डीओसीचे खाद्य ट्रकद्वारे भरल्या जाण्याचे काम सुरू आहे. सोया कंपनी ते रेल्वे स्टेशन दरम्यान ट्रकमधील डीओसी चोरी होत असल्याची माहिती कंपनीचे जनरल मॅनेजर गोविंद रामलखन दुबे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर दुबे यांनी ट्रकवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचार्यांचे विशेष पथक तयार केले होते. या पथकाला ट्रकमधून डीओसी चोरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती दुबे यांना दिली. लगेचच दुबे यांनी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव व जमादार संजय आमटे यांना चोरीचा माल ज्या वाहनामध्ये वाहुन नेल्या जात आहे. त्या वाहनाचा क्रमांक दिला. या माहितीवरून पोलिसांनी मालवाहु वाहनाचा पाठलाग करून त्याला रंगेहात पकडले. दुबे यांनी या घटनेची पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदविली असून पोलिसांनी एम.एच. ३0 एल २६७३ क्रमांकाच्या वाहन मालकाविरूध्द गुन्हा दाखल केला.
सोया फॅक्टरीमधील पशुखाद्याची चोरी
By admin | Updated: September 2, 2015 02:20 IST