लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कपाशीची पहिली वेचणी आटोपल्यानंतर जिल्ह्यात दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. व्यापारयांकडून कपाशीला ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचे दर देण्यात येत असल्याने यंदाही शासकीय खरेदी केंद्रांना कापूस मिळणे कठीण असल्याचे दिसत आहे.गतकाही वर्षांप्रमाणेच यंदाही जिल्ह्यात विविध नैसर्गिक संकटाचा फटका कपाशीला बसला असून, बहुतांश शेतकºयांना या पिकावर केलेला खर्चही वसुल होणे कठीण असल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातही गतवर्षीच्या तुलनेत यंदा या पिकाची पेरणी ४० टक्क्यांनी घटली. गतवर्षी ३० हजार ५०० हेक्टर असलेले कपाशीचे क्षेत्र यंदा १८ हजार ६०० हेक्टरवर आले. जिल्ह्यात कपाशीची पहिली वेचणी पूर्ण झाली असून, शेतकरी कापूस खरेदीला सुरुवात होण्याची प्रतिक्षा करीत असताना जिल्ह्यात व्यापाºयांकडून दिवाळीच्या मुहुर्तावर कापूस खरेदी सुरू करण्यात आली. शासनाने कपाशीसाठी मध्यम धाग्याच्या कपाशीला ५ हजार १५० आणि लांब धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल ५४५० रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव जाहीर केले आहेत. त्यात यंदा कापूस बाजार तेजीत असल्याने व्यापाºयांकडून चांगल्या आणि लांब धाग्याच्या कापसाला ६ हजार ते ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचे दर देण्यात येत आहेत. अर्थात हमीदरापेक्षा व्यापाºयांकडून १ हजार रुपये अधिक दर मिळत् असल्याने शेतकरी वर्गाने व्यापाºयांकडे कापूस विक्रीसाठी घाई सुरू केली आहे. दरम्यान, शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यास अद्याप वेळ असल्याने शेतकरी व्यापाºयांकडेच कापूस विकण्याचीही घाई करीत आहेत.
खाजगी बाजारात कापूस खरेदीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:20 IST