वाशिम: प्रत्येक नागरिकाला जलदगतीने न्याय मिळावा, यासाठी तालुकास्तरावरील न्यायालयांची निर्मिती झाली. त्यामुळे अन्यायग्रस्त नागरिकांना जलदगतीने न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयाच्या न्यायमूर्तींंंसह संबंधित सर्व घटकांनी कटिबद्ध राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मानोरा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केले. रविवारी आयोजित उद्घाटन सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूूर्ती झेड. ए. हक, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य आशिष देशमुख, मानोराचे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी आर.बी. राजा, मानोरा तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष .अँड. आर.डी. ठाकरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी वाशिमचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची होते. न्यायमूर्ती गवई पुढे म्हणाले की, मानोरा न्यायालयाला अतिशय सुसज्ज इमारत मिळाली आहे. या इमारतीमध्ये मानोरा तालुक्यातील नागरिकांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी प्रयत्न व्हावा. त्यामुळे अन्यायग्रस्त गोरगरीब नागरिकांना फायदा होईल. यावेळी न्यायमूर्ती झेड. ए. हक, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य आशिष देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अँड. आर.डी. ठाकरे यांनी केले. आभार मानोरा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश आर.बी. राजा यांनी मानले. संचालन मानोरा तालुका विधी समितीचे सहसचिव अँड. पवन राठोड यांनी केले. अकोला, पुलगाव, यवतमाळ, आर्णी, दिग्रस येथील न्यायाधीश, वकील, अधिकारी-कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
जलद न्यायासाठी कटिबद्ध राहा - भूषण गवई
By admin | Updated: February 8, 2016 02:25 IST