सायखेड (अकोला): शेतातील वीज जोडणीच्या अर्थिंगला स्पर्श होऊन, विजेचा धक्का लागून दीड वर्षीय चिमुकलीसह तिच्या वडिलांचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बाश्रीटाकळी तालुक्या तील धामणदरी (केशवनगर) या आदिवासीबहुल गावात रविवारी सकाळी घडली. सारंगधर चंद्रभान करवते (३५) आणि स्वाती सारंगधर करवते (१८ महिने) ही मृतांची नावे आहेत. सारंगधर करवते यांनी उदरनिर्वाहासाठी गावाशेजारी अतिक्रमित जमिनीवर शेती केली होती. शेतातच त्यांनी घर बांधून सिंचनासाठी विहीरही खोदली. शेतात वन्यप्राणी आले, तर ते दिसावे यासाठी, करव ते यांनी घरातून शेतापर्यंत विद्युत पुरवठा घेतला होता. त्यासाठी शेतातच अर्थिंग (भूसंपर्कन) दिली होती. रविवारी पहाटे ६.३0 वाजताच्या सुमारास ते स्वातीला घेऊन फेरफटका मारण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी स्वातीचा स्पर्श विद्युत पुरवठा सुरू असलेल्या अर्थिंंगला झाला. स्वातीला वाचविण्यासाठी वडिलांनी तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा प्रयत्न व्यर्थ ठरला. यात दोघांचाही मृत्यू झाला. स्वातीची आई तिला अंघोळीला बोलावण्यासाठी शेतात आली, तेव्हा तिला दोघेही निपचित अवस्थेत पडलेले दिसले. तिने हंबरडा फोडताच गावकर्यांनी घटनास्थळी पोहोचून, विद्युत पुरवठा बंद केला.
विजेच्या धक्क्याने बापलेकीचा मृत्यू!
By admin | Updated: October 13, 2014 00:55 IST