वाशिम : हगणदारी निर्मुलनाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासन कामाला लागले आहे. यासंदर्भात लोकमानसिकता बदलासाठीचा अँक्शन प्लन तयार करण्यात आला असून प्रायोगिक तत्वावर वाशिम तालुक्यातील वाळकी दोडकीचे सर्वेक्षण करणार्या जि. प. प्रशासनाने येत्या मार्चपर्यंत पाणी व स्वच्छतेची व्याप्ती अधिक असलेल्या गावांना आधी निर्मल बनवुन नंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत हागणदारीमुक्तीचा कृती आराखडयानुसार काम करण्याचे नियोजन केले आहे. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आयपीसी अर्थात अंतर व्यक्ति संवाद आणि गृहभेटींवर जास्त भर देण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी यापूर्वीच शौचालयाचे अनुदान वाटपासाठी विशेष मोहिम हाती घेउन जिल्हा निर्मल करण्याचा संकल्प केला होता. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन मार्फत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेषत: पाणी व स्वच्छता क्षेत्राशी संबंधित सेवा- सुविधांबाबत मुख्यत: जनजागृती व क्षमता बांधणी संबंधात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गावातील लोकांना शौचालय बांधकाम व शौचालय वापरासाठी प्रेरित करण्यात येते. या कामात अधिक सुसुत्रता यावी म्हणून यापूर्वी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र यामध्ये त्रुटी राहिल्यामुळे अनेक पात्र लोकांना शौचालय बांधकामानंतर प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळत नव्हता. या पार्श्वभूमिवर गावाची इत्यंभूत माहितीचे संकलन व्हावे आणि त्यानुसार गावात इंटर पर्सनल कम्युनिकेशन अर्थात अंतर व्यक्ती संवाद या नविनतन उपक्रमांचे नियोजन करता यावे या उद्देशाने ग्रामपंचायतींचा कच्चा डाटा संकलीत करुन त्या आधारे त्या ग्रामपंचायतीचा कृती आराखडा बनविण्यात येणार आहे. टप्प्या- टप्प्याने जिल्ह्यातील ४९३ ग्रामपंचायतींचा हगणदारी निर्मुलन कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे यांनी दिली. या कामाला सुरुवात करताना जिल्ह्यातील स्वच्छता आणि पाण्याची व्याप्ती अधिक असलेल्या गावांवर प्राधान्याने हगणदारीमुक्तीसाठी भर दिला जाणार आहे. येत्या मार्चपर्यंत किमान सर्वेक्षणाचे काम आटोपून त्यानंतर येणार्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण हगणदारीमुक्तीच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचे काम हाती घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही श्रृंगारे यांनी स्पष्ट केले.
हागणदरीमुक्तीसाठी आता कृतीशिल पावले !
By admin | Updated: August 27, 2014 00:11 IST