लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: तालुक्यात शासनाच्या १४ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गतवर्षी हजारो रोपांची लागवड करण्यात आली. त्या रोपांचे संवर्धन करण्यासाठी लावलेल्या रोजगार सेवकांचा ५४ लाख रुपयांचा मोबदला रखडला आहे. कामाचा मोबदला न मिळाल्याने रोजगारसेवकांनी रोपांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निम्म्याहून अधिक रोपे सुकली आहेत.मालेगाव तालुक्यात १४ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना वृक्ष लागवडीचे स्वतंत्र उद्दिष्ट देण्यात आले होेते. वृक्ष लागवड मोहिमेनंतर शासन निर्देशानुसार रोपांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायतींनी रोजगारसेवक नियुक्त केले. त्या रोजगारसेवकांचा मोबदलाच काढण्यात आला नाही. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मिळून रोजगारसेवकांच्या मोबदल्याचे ५३ लाख ९५ हजार रुपये प्रलंबित आहेत. केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसल्याने रोजगारसेवकांनी वृक्ष संवर्धनाच्या कामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत लागवड केलेली निम्म्याहून अधिक रोपे आता सुकली असून, यामुळे शासनाच्या वृक्ष लागवडीचा उद्देश असफल झाला आहे.
मालेगावातील ग्रामपंचायतींचे वृक्ष लागवडीचे ५४ लाख थकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 18:03 IST