सुनील काकडे वाशिम, दि. ८- जिल्ह्यातील तब्बल ४६ हजारांच्या आसपास कृषिपंपांना ऑटो स्विच बसविलेले आहेत. यामुळे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असून, रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. तथापि, सर्वांगाने नुकसानदायक ठरू पाहणारे ऑटो स्विच काढून टाकण्याबाबत महावितरणकडून युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शेतकर्यांकडून त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती दस्तुरखुद्द महावितरणचे अधीक्षक अभियंता डी.आर. बनसोडे यांनी बुधवार, ८ मार्च रोजी लोकमतशी बोलताना दिली.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत महावितरणच्या कृषिपंपधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. त्यापैकी जवळपास ५0 हजार शेतकर्यांनी शेतांमधील मोटारपंपांना ऑटो स्विच बसविले आहेत. गत दोन महिन्याच्या काळात त्यापैकी चार हजार पंपांचे ह्यऑटो स्विचह्ण हटविण्यात महावितरणला यश आले असले, तरी अद्याप ४६ हजार पंपांसंबंधीचा हा प्रश्न कायम असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.तथापि, भारनियमनासह तांत्रिक अडचणींमुळे खंडित होणारा विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर मोटारपंपाजवळ न जाताच रिमोटद्वारे पंप सुरू करता यावा, यासाठी शेतकर्यांनी हा प्रकार अवलंबिला आहे. परंतु केवळ काही क्षणाच्या त्रासापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मोटारपंपांना बसविण्यात आलेले ह्यऑटो स्विचह्ण अत्यंत धोकादायक ठरत आहेत. सध्या ग्रामीण भागात ठरावीक कालावधीत विजेचे भारनियमन केले जात आहे. यादरम्यान विीज पुरवठा सुरळीत होताच एकाचवेळी सर्व शेतकरी रिमोटद्वारे शेतांमधील मोटारपंप सुरू करतात. यामुळे वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण येण्यासोबतच रोहित्र जळून खाक होत आहेत. याशिवाय मोटारपंपही नादुरुस्त होत असल्याने मोटारपंपाचे ऑटो स्विच काढून टाकावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.
४६ हजार कृषिपंपांना ‘ऑटो स्विच’!
By admin | Updated: March 9, 2017 02:21 IST