वाशिम : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून जिल्ह्यातील १२२ पैकी तब्बल ४३ लघुप्रकल्पांनी तळ गाठला आहे. ग्रामीण भागातील हातपंप, कुपनलिका यासह इतर जलस्त्रोतही कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने शेकडो गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली आली आहेत. असे असताना अद्याप कृती आराखड्याच्या अमंलबजावणीच्या दृष्टिने कुठलेही पाऊल उचलले नसल्याने पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात येणार्या उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जलसंपदा विभागाकडून सोमवारी मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १२२ लघुप्रकल्पांपैकी ११ लघुप्रकल्प पूर्णत: कोरडे पडले असून, ३२ लघुप्रकल्पांमधील उपयुक्त जलसाठय़ाची पातळी शून्य टक्क्यावर पोहचली आहे. उर्वरित तीन मध्यम आणि ७९ लघुप्रकल्पांपैकी २0 प्रकल्पांमध्ये 0 ते १0 टक्के जलसाठा शिल्लक असून २७ प्रकल्पांमध्ये १0 ते २५ टक्के, ३0 प्रकल्पांमध्ये २५ ते ५0 टक्के आणि केवळ पाच प्रकल्पांमध्येच ५0 ते ७५ टक्के पाणीसाठा आजरोजी शिल्लक आहे. तथापि, प्रकल्पांमधील पाणीसाठय़ासंदर्भात विदारक परिस्थिती उद्भवल्यामुळे शेकडो गावे पाणीटंचाईच्या संकटात सापडली आहेत. असे असताना प्रशासकीय पातळीवरून मात्र अद्याप ठोस तथा प्रभावी उपाययोजना राबविण्याकामी धिमे धोरण अंगिकारण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात रिसोड तालुका "डेंजर झोन"मध्ये
जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत रिसोड तालुका यंदा पाणीटंचाईच्या बाबतीत ह्यडेंजर झोनह्णमध्ये आहे. या तालुक्यात १७ लघुप्रकल्प असून आजमितीस त्यातील तब्बल १३ प्रकल्प कोरडे पडले आहेत. दोन प्रकल्पांमध्ये१0 टक्क्यांपर्यंत; तर दोन प्रकल्पांत २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ मालेगाव तालुका असून या तालुक्यातील २१ पैकी ८ प्रकल्पांनी तळ गाठला असून उर्वरित १५ प्रकल्पांमधील पाणीसाठाही लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे.