लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणे आणि वेळीच रुग्णांवर उपचार मिळणे या उद्देशातून ७ डिसेंबरपासून गावोगावी तपासणी शिबिर घेत संदिग्ध नागरिकांची ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’ केली जात आहे. गत १५ दिवसांत ९६७६ जणांची ‘अँटिजेन टेस्ट’ केली असून, यापैकी २५९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. पाॅझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण २.६८ टक्के एवढे आहे.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी मेडशी (ता. मालेगाव) येथे आढळला होता. जून महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. जुलै व ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढून हा आकडा १,७५३ पर्यंत पोहोचला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने या एका महिन्यात २,६२८ कोरोना रुग्णांची भर पडल्याने सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४,३८१ वर पोहोचला. ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात. कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना शासनाने जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या. त्यानुसार ७ डिसेंबरपासून जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागातही तपासणी शिबिर घेत संदिग्ध रुग्णांसह सर्दी, ताप व खोकला अशी लक्षणे असणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. ७ ते २१ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ९६७६ जणांची आरटी-पीसीआर, अँटिजेन चाचणी केली असून, यापैकी २५९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले. अहवाल पाॅझिटिव्ह येण्याची टक्केवारी २.६८ अशी आहे. जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवून आरटी-पीसीआर, अँटिजेन चाचणी केली जात आहे. ७ ते २१ डिसेंबरपर्यंत ९६७६ जणांची चाचणी केली असून, २५९ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. - डाॅ.अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी
‘रॅपिड ॲन्टिजन टेस्ट’मध्ये 2.68 टक्के 'पॉझिटिव्ह'!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 12:07 IST