प्रारूप आराखड्याला मंजुरी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 11:32 PM2020-02-15T23:32:57+5:302020-02-15T23:34:54+5:30

निवडणूक आयोगाकडे लक्ष । आरक्षण तारीख पुढे जाण्याची शक्यता, अद्यापही संभ्रम कायम

When is the draft plan approved? | प्रारूप आराखड्याला मंजुरी केव्हा?

प्रारूप आराखड्याला मंजुरी केव्हा?

Next

अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांनी प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. मात्र, त्या आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आरक्षण सोडतीची तारीख पुढे जाण्याचे संकेत विश्वसनीय सूत्राने ‘लोकमत’ला दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार नगरपालिका प्रशासनाने अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. हा आराखडा पाठवून दोन दिवस उलटले तरी त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. प्रभागनिश्चितीचे आदेश होत नाही, तोपर्यंत प्रभागांचे आरक्षण काढणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र, आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी न दिल्याने आरक्षण सोडत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. मात्र, नवीन आदेश अद्याप न आल्याने पालिका अधिकारी संभ्रमात आहेत. दुसरीकडे निवडणूक आरक्षण सोडतीसाठी होणारा विलंब हा राजकीय हस्तक्षेपामुळे होत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. यासंदर्भात अधिकारी मात्र काहीही बोलण्यास तयार नाहीत. केवळ निवडणूक आयोगाचे आदेश येतील त्याप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमिषाला बळी पडू नका - पवार
अंबरनाथ : अंबरनाथ पालिका निवडणुकीत आरक्षित वॉर्ड हे निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणेच पडणार आहेत. त्यामुळे शहरात कोणी आरक्षण बदलून देतो, असे सांगून पैसे लाटत असले तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन मुख्याधिकारी देविदास पवार यांनी केले आहे. शनिवारच्या ‘लोकमत’मध्ये ‘आरक्षणबदलासाठी घोडेबाजार’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले. त्या अनुषंगाने मुख्याधिकाऱ्यांनी शनिवारी तातडीची पत्रकार परिषद घेत नागरिकांना आवाहन केले आहे. निवडणूक आरक्षणात कुणी घोडेबाजार करत असेल, तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. निवडणूक आयोगाचे आदेश काटेकोरपणे पाळले जात आहेत. त्यात कोणतीही हेराफेरी होणे शक्य नाही. तसेच जे बदल घडतात, त्याची सर्व माहिती ही संकेतस्थळावर टाकली जाते. सर्वांना माहितीसाठी नकाशे आणि प्रारूप आराखडे मिळतील. तसेच जे आरक्षण पाडण्यात आले आहे, त्या आरक्षणाचा खुलासाही केला जाईल, असे पवार म्हणाले.

Web Title: When is the draft plan approved?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.