- पंकज राऊतलोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) १९७०च्या दशकात तारापूर येथे औद्योगिक क्षेत्र उभे करण्यापूर्वी परिसरातील १३ गावांतील ग्रामस्थ हे विहिरी, कुपनलिकेच्या नैसर्गिक पाण्यावर तहान भागवत होते. परंतु, त्यानंतर उभारलेल्या एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांतून प्रक्रियेविनाच अनधिकृतपणे नाल्यात सोडण्यात येणाऱ्या रासायनिक प्रदूषित सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाणीही प्रदूषित झाले. परिणामी, या गावांना आता एमआयडीसीच्या विकतच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
एमआयडीसी परिसरातील सालवड, पास्थळ, सरावली, कोलवडे, पाम, टेंभी, कुंभवली, खैरापाडा आदी ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थ भूगर्भातील नैसर्गिक व शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरत होते. १९७० नंतर एमआयडीसी परिसरातील गावांमधील नैसर्गिक पाणी प्रदूषित सांडपाण्यामुळे प्रदूषित झाले. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे पालघर जिल्हा परिषदेद्वारे २०२१ मध्ये केलेल्या परीक्षणात समोर आले. नंतर तारापूर व परिसरातील १३ ग्रामपंचायतींतर्गत १६ गावांमधील ८६ सार्वजनिक व ५३५ खासगी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे पाणी दूषित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे रसायनमिश्रित पाणी पिण्यास अयोग्य असल्याने या स्रोतांवर जिल्हा परिषदेने बंदी घातली. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच नाले-गटारात सोडत आहेत. त्यामुळे एमआयडीसीकडून विकत पाणी घेऊन नागरिकांना तहान भागवत आहेत.
यांच्यामुळे पाणी केमिकलयुक्तमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसी यांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना अमलात आणल्या नाहीत. तसेच राजरोसपणे केमिकल साेडणाऱ्यांविरोधातही ठोस भूमिका न घेतल्याने एमआयडीसी परिसरातील भूगर्भातील पाणी केमिकलयुक्त झाल्याचे आरोप केले जात आहेत.
‘सूर्या’चे पाणी उचलून केले जाते शुद्धीकरण एमआयडीसी सूर्या नदीचे पाणी उचलून ते गुंदले येथील शुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून प्रतिदिन ३५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा तारापूर येथील १,२०० उद्योग, ग्रामपंचायतींना पुरवठा करते. परंतु, प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील वाढत्या लोकवस्तीमुळे ग्रामपंचायती आपल्या क्षेत्रात पाणी पुरवठा करताना कसरत करतात.
पाणीटंचाईबाबत सरपंच काय म्हणतात?वाढती लोकसंख्या व उपलब्ध पाण्याचा विचार करता ग्रामस्थांना पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागत आहे. आमच्या गावच्या भूगर्भातील पाणी जोपर्यंत रसायनमुक्त होत नाही तोपर्यंत आम्हाला एमआयडीसीने पुरेसे पाणी द्यावे, तसेच केमिकलयुक्त पाण्यामुळे शेतजमिनी नापीक झाल्याने शेतकऱ्यांनाही भरपाई द्यावी. संजय पाटील, सरपंच, सालवड ग्रामपंचायत
सरावली ग्रामपंचायतीने मागणी केलेल्या अतिरिक्त पाणीपुरवठा लाइन लवकर मंजूर कराव्यात. रासायनिक पाण्यामुळे जलस्रोत प्रदूषित झाले, त्याचे नाहक परिणाम आम्हाला सहन करावे लागत असून, आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. आनंद धोडी, सरपंच, सरावली ग्रामपंचायत
पास्थळ गावात कूपनलिकेचे पाणी पेट्रोलसारखे रंगीत येते, त्यामुळे ते पिण्यायोग्य राहिले नसल्याने १०० टक्के एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. आम्हाला एमआयडीसीकडून २४ तास पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्याची परिस्थिती गंभीर होत आहे, तसेच आमच्या ग्रामपंचायतीची थकबाकी रद्द करावी.अनंत सोमण, सरपंच, पास्थळ ग्रामपंचायत