वसई : लग्नाआधी तिसरा मंडप म्हणजे हळदीच्या कार्यक्रमातून दारू पिण्याची प्रथा बंद करण्यासाठी सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाने तिसरा मंडप नको म्हणून विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला साथ देणाऱ्या समाजबांधवांचा जाहीर सत्कारही करण्यात येणार आहे.वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यांत सोमवंशी क्षत्रिय समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. समाजात लग्नाआधी हळदीच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर दारू पिण्याची प्रथा आहे. त्यामुळे व्यसनाला प्रोत्साहन मिळते. तर, अशा प्रथेमुळे ज्यांची ऐपत नाही, अशा कुटुंबाला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. म्हणून ही प्रथा मोडीत काढण्यासाठी संघाचे अध्यक्ष विलास चोरघे यांनी मोहीम हाती घेतली आहे. एकजुटीने ही प्रथा मोडीत काढू, असे आवाहन चोरघे यांनी केले होते. त्याला अनेकांनी साथ दिली. अशा कुटुंबांचा जाहीर सत्कार केळवे येथे होणाऱ्या क्रीडा महोत्सवात करण्यात येणार आहे. ९ व १० जानेवारीला क्रीडा महोत्सवसंघाचा ३८ वा क्रीडा महोत्सव ९ व १० जानेवारी २०१६ रोजी केळवे येथील कै. बी.के. राऊत (अण्णा) क्रीडानगरी, आदर्श विद्यामंदिर पटांगण येथे संपन्न होत आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन टेक्सस अमेरिका हाफ-आयर्न मॅन ट्रायथलॉनपटू हार्दिक पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार असून या वेळी प्रमुख अतिथी जागतिक व आशियाई पदक विजेत्या, अॅथलिट स्रेहल रजपूत-राऊत उपस्थित राहणार असून स्वागताध्यक्ष केळवे गावचे सरपंच अरविंंद वर्तक हे भूषवणार आहेत.१० जानेवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एअर कंट्रोल इंडिया प्रा.लि.चे चेअरमन व मॅनेजिंंग डायरेक्टर अशोक पाटील उपस्थित राहणार आहेत. या वेळी विशेष अतिथी म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कारप्राप्त पल्लवी वर्तक तसेच आॅस्ट्रेलिया येथे झालेल्या जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकविजेते विजय चौधरी व अमन चौधरी हजर राहणार आहेत. (वार्ताहर)
व्यसनमुक्ती हवीय? लग्नात ‘तिसरा मंडप’ नको!
By admin | Updated: January 9, 2016 01:53 IST