वसई : विरार शहरातील आठवडा बाजार पुन्हा सुरु करण्यावरून मच्छिमार स्वराज्य समिती आणि पालिका प्रशासनामध्ये संघर्ष सुरु झाला आहे. प्रशासनाने प्रारंभी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर घुमजाव केल्याने समितीने आठवडा बाजारासाठी आंदोलन छेडणचा निर्णय घेतला आहे.पालिका मुख्यालया शेजारी असलेल्या मैदानात ब्रिटीश काळापासून आठवडा बाजार भरत होता. याठिकाणी स्थानिकांसह जिल्ह्यातील पालघर, डहाण, जव्हार, मोखाडा याठिकाणाहून भूमीपूत्र भाजीपाला, सुकी मासळी, शेतमाल विकावयास येत असत. पण, काही वर्षांपूर्वी पालिकेने आठवडा बाजार बंद केला. त्यानंतर आता मैदानात वाहनांची पार्किंग आणि परिवहनचा बस स्टँड केला आहे. हा आठवडा बाजार पुन्हा सुरु व्हावा, यासाठी समितीचे अध्यक्ष राजू तांडेल यांनी विक्रेत्या महिलांसह पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तांडेल यांनी आयुक्त सतीश लोखंडे आणि महापौर प्रवीणा ठाकूर यांची भेट घेतली होती. पहिल्या भेटीत आठवडा बाजार पुन्हा सुुरु करण्यासाठी लोखंडे आणि ठाकूर यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, आता बाजाराला विरोध केला असल्याची माहिती तांडेल यांनी दिली. मैदानाचा उपोग ठोक्यावर चालणाऱ्या परिवहन सेवेला होतो. त्यातून पालिकेला उत्पन्नही मिळत नाही अथवा स्थानिकांना रोजगारही मिळत नाही. तसेच याठिकाणी पार्किंगने जागा व्यापली आहे. तर बाजाराला विरोध करण्यासाठी प्रशासनाने आता बुलडोझर, अवजड मशिनरी, जेसीबी, मोठी वाहने उभी केली आहेत. मात्र, हा विरोध डावलून आठवडा बाजार सुुरु करणारच. त्यासाठी उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तांडेल यांनी दिला आहे. त्यामुळे आता मच्छिमार विरुद्ध प्रशासन असा नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
विरारला मच्छीमार-प्रशासन संघर्ष
By admin | Updated: October 28, 2016 02:29 IST