Palghar Accident: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलावरून रॉकेलने भरलेला टँकर खाली. पुलावरुन खाली पडल्याने ट्रकने पेट घेतला. पालघरमधील मनोर परिसरातील मसान नाक्याजवळ रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र चालक जखमी झाला आहे. या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
रविवारी पालघरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसान नाका येथे भीषण अपघात झाला. अपघाताची घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने रॉकेल घेऊन जाणारा टँकर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मसान नाक्याजवळ येताच उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकला. यानंतर तो थेट तीस फूट खोल सर्व्हिस रोडवर पडला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचा टँकरवरील ताबा सुटला होता.
या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रॉकेलची गळती झाल्याने सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक लोकांच्या मदतीने टँकर चालकाला बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. हा अपघात इतका भीषण होता की त्यामुळे टँकरचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने उड्डाणपुलाखाली प्रवासी किंवा अन्य कोणतेही वाहन नव्हते. तसेच टँकरला लागलेली आग काही वेळातच विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे महामार्ग २ तास बंद होता. यानंतर महामार्ग पुन्हा सुरु करण्यात आला. सध्या या अपघाताची चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. टँकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि आग कशी लागली याचा तपास करण्यात येत आहे.